मुंबई : रुपारेल बोगद्याला जलवाहिनी जोडणीचे काम २८ ते ३0 जानेवारी हाती घेण्यात आले आहे. या काळात दक्षिण मुंबईतील काही भागांत पाणीपुरवठा बंद तर काही भागांत पाणीकपात करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
मरोशी ते रुपारेल दरम्यान ३000 मिमी. व्यासाच्या भूमिगत बोगद्याद्वारे पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी माहिम येथे मोठी जलवाहिनी रुपारेल बोगद्याला जोडण्यात येत आहे. भूमिगत बोगदा जवळजवळ दुरुस्तीविरहित असल्याने जास्त दाबाने अखंड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे व त्यामुळे पाणीपुरवठय़ात सुधारणा घडवून आणता येईल. ३000 मिमी. व्यासाच्या मरोशी-रुपारेल बोगदा प्रकल्पाशी निगडित, २४00 मिमी. व्यासाची जलवाहिनी माहिम शाफ्ट येथील जोडणीचे काम २८ ते २0 जानेवारी रोजी टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात येणार आहे. जलवाहिनी जोडण्याचे काम करण्याकरिता मलबार टेकडी जलाशयाचा पाणीपुरवठा जवळपास २१ तास बंद करावा लागणार आहे.
