व्यवसायांना विविध परवाने सहा दिवसांत देणार - पालिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

व्यवसायांना विविध परवाने सहा दिवसांत देणार - पालिका

Share This
मुंबई : हाँगकाँगच्या धर्तीवर मुंबईतील उद्योग आणि व्यवसायांना महापालिका विविध परवाने सहा दिवसांत देण्याची प्रक्रिया पार पाडणार आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. 

गेल्या वर्षापासून महापालिकेत अस्तित्वात आलेल्या व्यवसाय विकास (बिझनेस डेव्हलपमेंट) या नव्या विभागाचे सादरीकरण श्रीनिवास यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केले. मुंबईत विविध व्यवसाय आणि उद्योग करण्यासाठी उद्योजकांना १३२ परवानग्या आणि ४५ परमिट घ्यावे लागतात. त्यांना होणारा हा त्रास पाहता महापालिकेने व्यवसाय विकास (बिझनेस डेव्हलपमेंट) हा विभाग सुरू केला आहे. त्याच्या प्रमुख शशी बाला यांना स्थायी समितीच्या बैठकीत पाचारण केले होते. त्यांची समितीला ओळख करून देण्यात आली. उद्योग आणि व्यवसायांसाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर परवानग्या देणारी मुंबई महापालिका ही जगातील एकमेव पालिका आहे. यामुळे या परवानग्या आणि परमिटची प्रक्रिया आणखी सुटसुटीत करण्यात येणार आहे. उद्योजक व व्यावसायिकांना परवानग्या आणि परमिट लवकर मिळावे म्हणून नवीन पद्धती आणण्यात येणार आहे, असे श्रीनिवास यांनी सांगितले. नरिमन पॉइंट, लोअर परेल, अंधेरी आणि बीकेसी ही चार 'बिझनेस डिस्ट्रिक्ट' आहेत. उद्योग व व्यवसाय मुंबईतच राहावे यासाठी मुंबईला बिझनेस हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईत कोणते उद्योग नाहीत, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages