घटनेच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष, समाजवादी शब्द वगळले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घटनेच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष, समाजवादी शब्द वगळले

Share This
मुंबई : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनी घटनेच्या सरनाम्याबाबत दिलेल्या जाहिरातीतून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' हे दोन्ही शब्द वगळल्याचे समोर आले आहे. यामुळे नवीन वाद निर्माण झाला असून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याच वेळी शिवसेना मात्र केंद्र सकारच्या बाजूने उभी राहिली आहे. भारत कधीच धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही. त्यामुळे घटनेच्या सरनाम्यातून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द कायमचे वगळा, अशी मागणीच शिवसेनेने केली आहे. 

केंद्र सरकारमध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांनी अगोदरच्या सरकारच्या अनेक कामांवर आक्षेप घेतले आहेत. काही बाबी भाजपा सरकारने बदलल्यादेखील आहेत. आता घटनेच्या सरनाम्यात समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्दांबाबत मतमतांतरे सुरू झाली आहेत. आतापर्यंतच्या रितीनुसार केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनी घटनेच्या सरनाम्याबाबत जाहिरात दिली. मात्र या जाहिरातीतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन्ही शब्द सरकारने वगळले आहेत. यामुळे वाद सुरू झाला असून केंद्र सरकारवर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. भाजपा सरकार भारताचा धर्मनिरपेक्षतेचा ढाचाच मोडीत काढत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. शिवसेनेने मात्र जाहीरपणे सरकारच्या भूमिकेचे सर्मथन केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, भारत हा देश कधीच 
धर्मनिरपेक्ष होऊ शकत नाही. यामुळे घटनेच्या सरनाम्यात समाविष्ट करण्यात आलेले धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द कायमचे वगळण्यात यावेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली तेव्हा त्यामध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द नव्हते. ते काँग्रेसने नंतर समाविष्ट केले आहेत. यामुळे मूळ घटना कायम ठेवण्यात यावी आणि हे शब्द केंद्र सरकारने वगळावेत, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. भारताची निर्मिती धर्माच्या आधारावर झाली आहे, असे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर वारंवार सांगत होते, असे देखील त्यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधींच्या काळात ४२ व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द सरनाम्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपाबरोबरच शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना लाचारीने सत्तेत सहभागी आहे. यामुळे त्यांना केंद्र सरकारच्या भूमिकेचे सर्मथन केले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. केंद्र सरकारने शब्द वगळण्याचे सर्मथन करण्यात आले आहे.

इंदिरा गांधी यांच्या काळात हे शब्द समाविष्ट करण्यात आले होते. यामुळे यापूर्वी भारत धर्मनिरपेक्ष नव्हता का? असा प्रतिप्रश्न करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी विरोधकांची टीक ा निराधार असल्याचे म्हटले आहे. जाहिरातीत घटनेच्या मूळ ढाचाप्रमाणे शब्दरचना करण्यात आली आहे. यामुळे त्यामध्ये घटनादुरुस्तीनंतरच्या शब्दांचा समावेश नाही. आम्ही खर्‍या घटनेचा सन्मान केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही एप्रिल २0१४ मध्ये याबाबत एका जाहिरात दिली होती. यामध्ये देखील अशाच मसुद्याचा समावेश होता. तेव्हा विरोधक कुठे गेले होते. आता सर्व विरोध राजकीय हेतूने सुरू आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages