मुंबई हाय अँलर्टवर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई हाय अँलर्टवर

Share This
मुंबई : प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौर्‍यावर येणार असल्याने सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली असतानाच आता मुंबईसह देशातील चार ठिकाणी दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी रचला असल्याचे उघडकीस झाले आहे. आठवडाभरात मुंबई, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या ठिकाणी हल्ल्याचा डाव रचला असल्याची माहिती गुप्तचर संस्था आयबीने दिली आहे. 


मुंबईतील प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरात मंगळवारी भाविकांची मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे अधिकाधिक जीवितहानी होण्यासाठी २८ जानेवारीला मंदिराला लक्ष्य करण्याची तयारी देखील दहशतवाद्यांनी केली असल्याने सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे भारत भेटीवर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्यांकडून भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा इशारा देण्यात येत असल्याने सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याचा दिवस, ठिकाणे आणि संघटनेच्या हस्तकांच्या नावांचा तपशील इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) या गुप्तचर संस्थेच्या हाती लागला आहे.त्यावरून, येत्या २८ जानेवारीपूर्वी शहरावर हल्ला चढवण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जमात-ऊल-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या चार दहशतवादी संघटनांचे दहशतवादी देशात दाखल झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. अतिरेक्यांचे चार वेगवेगळे गट बनवण्यात आले असून हे गट अनुक्रमे महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचा तपशीलही आयबीच्या हाती लागला आहे. यापैकी मुंबईला लक्ष्य करण्याची जबाबदारी अब्दुल्ला-अल-कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या अतिरेक्यांवर सोपवण्यात आली आहे. 

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य आहे. मंगळवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला होणारी गर्दी पाहता या दिवशीच हल्ला होण्याची शक्यता आहे. आयबीकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिल्या आहेत. समुद्रामार्गे दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने योग्य ती खबरदारी घेऊन संवेदनशील ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages