मुंबई मधील झाडे गेली कुठे ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मधील झाडे गेली कुठे ?

Share This
पर्यावरणाचे संरक्षण करा आणि ग्लोबल वार्मिंगच्या नावाने सतत झाडे लावा झाडे जगवा असे संदेश सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिले जातात. अश्या जाहिरातीवर करोडो रुपये खर्च केले जात असले तरी म्हणावा तसा फरक दिसत नाही. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका दर वर्षी गाजा वाजा करत १ लाख झाडे लावते. या पैकी किती झाडे नेमकी लावली जातात आणि किती जगतात याची आकडेवारी कुठेही प्राप्त होत नाही. 
मुंबई महानगर पालिकेने २ कोटी ७ लाख रुपये खर्च करून नागपूरच्या 'सार आयटी सर्व्हिसेस' या संस्थेमार्फत फेब्रुवारी २०१४ पासून मुंबईमधील वृक्षांची गणना करत आहे. ओव्हल मैदानापासून सुरु झालेली हि वृक्ष गणना सध्या ५० टक्क्या पर्यंत पोहचली आहे. अद्याप १० लाख वृक्षांची गणना झाली असून यापैकी ३६०० वृक्ष धोकादायक अवस्थेत आढळली आहेत. मुंबई मध्ये गेले कित्तेक वर्षे करोडो रुपये खर्च करून वर्षाला एक लाख झाडे लावली असली तरी सर्वेक्षणात अद्याप १० लाख झाडांची नोंद झाली आहे. 

यामुळे दरवर्षी गाजावाजा करत लावण्यात येणारी लाखो झाडे जातात कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. हि झाडे खरोखरच लावली जातात का ? झाडे लावली जातात तर कोणत्या ठिकाणी लावली जातात ? लाखो झाडे लावण्याचा पालिका दिखावा तर करत नाही ना ? झाडे लावली म्हणून दाखवून याचा पैसा अधिकारी आणि इतर कोणाच्या खिश्यात तर जात नाही ना ? पालिका लाखोंच्या संखेने झाडे लावते मग हि झाडे मोठ्या संखेने मरत असतील किंवा गायब होत असतील तर त्याच्या मागची कारणे कोणती ? असे कित्तेक प्रश्न उपस्थित होत आहे.  

एकीकडे मुंबई महानगर पालिकेने लावलेली झाडे आणि सर्वेक्षणात नोंद होणारी झाडे या मध्ये मोठा फरक असताना आता पालिका झाडे तोडण्यासाठी नवीन कायदा करत आहे. भारतीय संविधानाने स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेला अधिकार दिले आहेत. या अधिकारामध्ये वृक्ष प्राधिकरण नावाचा विभाग काम करतो. याचे प्रमुख पालिका आयुक्त असले तरी यामध्ये विविध पक्षाचे लोक सदस्य आहेत. काही कारणास्तव झाडे तोडावयाची असल्यास प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये अशी मंजुरी घ्यावी लागते. म्हणून मुंबईमधील बिल्डर लॉबीने भारताच्या प्रधानमंत्रांकडे धाव घेवून हे नियम बदलण्याची मागणी केली होती. यानुसार प्रधानमंत्र्यांनी बिल्डरांना खुश करण्यासाठी आयुक्तांना पत्र पाठवून नियमात बदल करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सध्या प्राधिकरणाचे अधिकार कमी करण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. 

पालिकेमध्ये वृक्ष तोडी संदर्भात एक कायदा बनवला जात आहे त्या नुसार कोणत्याही विकासकाला आपल्या विकासाच्या आड येणारी झाडे तोडावयाची असल्यास त्याला उप आयुक्त आणि आयुक्त यांच्या परवानगीने घेवून झाडे तोडता येणार आहेत. यामध्ये १० झाडे तोडण्यासाठी उप आयुक्त, १० ते ५० झाडे तोडण्यासाठी किंवा सरकारी कामासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी झाडे तोडण्याची परवानगी आयुक्त देणार आहेत. इतर वेळी मात्र ५० च्या वर झाडे तोडावयाची असल्यास त्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणापुढे आणला जाणार आहे. यामुळे प्राधिकरणाच्या अधिकारावर गदा आणण्याचे आणि सदस्यांचे अधिकार कमी करण्याचे काम सुरु झाले आले आहे. 

मुंबईतील इमारत, चाळ, झोपडपट्टय़ांचे बांधकाम, पुनर्विकास प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा पुरवणा-या विकास प्रकल्पांच्या आड येणारी झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक असले तरी नव्या नियमाप्रमाणे अश्या विकसासाठी आता प्राधिकरणा ऐवजी उप आयुक्त किंवा आयुक्त परवानगी देणार आहेत. मुंबई मध्ये जास्त झाडे अस्तित्वातच नसल्याने विकासाच्या आड येणारी झाडे तोडण्यासाठीची परवानगी देण्यासाठी भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. विकासक विकास करताना झाडे तोडत असला तरी विकास पूर्ण झाल्यावर झाडे लावतोच असे नाही. किती विकसकांनी झाडांचे पुनर्वसन केले किंवा नेमकी किती झाडे नव्याने लावली याचा पालिकेने शोध घेवून विकसकांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे. 

लवकरच मुंबई मध्ये मेट्रो ३ या प्रकल्पा अंतर्गत कारशेड आणि रस्ता रुंदीकरणासाठी एमएमआरडीएने गोरेगाव आरे येथील जवळपास २३०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव पालिकेला दिला आहे. लवकरच हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये येणार आहे. पायाभूत विकासासाठी हा प्रकल्प राबवला जाणार असल्याने याला मंजुरीही मिळेल. कोणताही प्रकल्प आणि विकास करताना त्या जागेवर जितकी झाडे आहेत त्या प्रमाणात इतर ठिकाणी त्याच प्रमाणात किंवा त्यापेक्षा जास्त झाडे लावावी लागतात. मुंबई मध्ये सर्वत्र सिमेंटचे जंगल उभे राहिल्याने अशी झाडे इतरत्र लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही याची नोंद पालिका घेणार का?

मुंबई मध्ये पालिकेने लावलेली झाडे जगत नाहीत ती लावल्या जागेवरून गायब होत आहेत, दुसरीकडे प्राधिकरणाचा अधिकार कमी करून झाडे तोडायला परवानगी दिली जाणार आहे, या आधी मुंबई मध्ये कित्तेक ठिकाणी इमारती, चाली आणि इतर कित्तेक प्रकारची विकास कामे झाली आहेत अश्या विकासकांनी किती झाडे नव्याने लावली, पालिका दरवर्षी लाखो झाडे लावते मग मुंबई मध्ये झाडांची संख्या कमी का आहे, या सर्व बाबींचा मुंबई महानगर पालिकेने विचार करण्याची गरज आहे. झाडे लावा झाडे जगवा अश्या नुसत्या बोंबा मारून जाहिरातीकरून काहीहि होणार नाही. येणाऱ्या काळात मुंबई वाचवायची असेल तर झाडे मोठ्या प्रमाणात जगवण्यासाठी कृतीशील काम करावे लागेल. अन्यथा सृष्ठीने आपले रूप दाखवले तर २६ जुलै आणि माळीन सारख्या घटनांना मुंबईला पुन्हा सामोरे जावे लागेल. 
अजेयकुमार जाधव 
मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages