बेस्टच्या एसी बसेस तोट्यात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या एसी बसेस तोट्यात

Share This
मुंबई : मुंबईकरांची सेकंड लाइफलाइन असलेल्या बेस्टची सध्या आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यातच बेस्ट उपक्रमाकडे असलेल्या एसी बसेसच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी लागणारा निधी आणि प्रवाशांची घटती संख्या या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे एसी बसेस बेस्ट प्रशासनाने बंद कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या बेस्टच्या परिवहन विभागातर्फे १७१ एसी बसेस मुंबई, ठाणे परिसरातील २२ बस मार्गांवर चालवण्यात येतात. या बस गाड्यांमधून दररोज सुमारे १ लाख २८ हजार प्रवासी प्रवास करतात. पूर्वी २८४ एसी बसेस चालवण्यात येत होत्या; परंतु एसी बसेसच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च येत असल्यामुळे बेस्ट उपक्रमातर्फे फक्त १७१ एसी बसेस सध्या चालवण्यात येत आहेत. साध्या बसेसच्या तुलनेत एसी बसेसचा देखभाल-दुरुस्ती खर्च खूप जास्त आहे. साध्या बसेसची आयुर्मयादा ही १५ वर्षांची असताना एसी बस मात्र ६ वर्षांतच ताफ्यातून बाहेर काढावी लागते. एका एसी बसमधून दिवसाला ९ हजार रुपये उत्पन्न मिळते. तर या बसच्या देखभालीसाठी १८ हजार रुपये बेस्ट उपक्रमाला खर्च करावे लागतात. परिणामी, एसी बसेस या बेस्ट उपक्रमाची डोकेदुखी झाल्या आहेत.बेस्टच्या बसेसमधून दररोज सुमारे ४0 लाख मुंबईकर प्रवास करतात. त्यापैकी फक्त १ लाख प्रवासीच एसी बसमधून प्रवास करतात. एसी बसेस रस्त्यावर बिघडण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. परिणामी, प्रवासी त्रस्त होतात. त्यामुळे एसी बसेसच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. एसी बसेस चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसणे, अशी अवस्था बेस्ट उपक्रमाची झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages