राज्य व केंद्र सरकार जातीयवादाला खतपाणी घालत आहेत - गुरुदास कामत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्य व केंद्र सरकार जातीयवादाला खतपाणी घालत आहेत - गुरुदास कामत

Share This

खोटी आश्‍वासने देऊन भाजपा आणि शिवसेना सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. खोटी आश्‍वासने देऊनच भाजपा आणि शिवसेनेने राज्यात सत्ता मिळवली असून राज्य आणि केंद्र सरकार जातीयवादाला खतपाणी घालत आहेत, असे घणाघाती आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व माजी खासदार गुरुदास कामत यांनी केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसने मंगळवारी आझाद मैदानात आयोजिलेल्या मोर्चात कामत बोलत होते. या मोर्चाला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
गुजरातच्या विकासाचा हवाला देऊन मोदी यांनी केंद्रात सत्ता मिळवली. पण आता गुजरातची अवस्था फारच वाईट झाली आहे, असे सांगून कामत म्हणाले की, प्रसंगी गुजरातमध्ये १४ तास वीजपुरवठा होत असे, पण आता वीज फक्त आठ तास मिळत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. घरवापसीच्या नावावर राज्य आणि केंद्र सरकार जातीयवाद फैलावत असून या मुद्यावरून मुंबईसह संपूर्ण देश ढवळून निघाला आहे, अशी टीका करून कामत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईकरांना जी स्वप्ने दाखवली होती, ती अजून पूर्ण झालेली नाहीत. गेली २0 वर्षे शिवसेना आणि भाजपा पालिकेत सत्तेमध्ये असून मुंबईकरांची लुटमार हे दोन्ही पक्ष करीत आहेत. त्यातच आता मालमत्ता कर, पार्किंगची दरवाढ आणि बेस्टची भाडेवाढ यांची भर पडल्यामुळे मुंबईकरांचे कंबरडे मोडले आहे.

मुंबई विभागीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर यांचेही या वेळी भाषण झाले. महापालिकेने पार्किंगचा भुर्दंड मुंबईकरांवर दरमहा १८00 रुपये लादला असून मुंबईकरांच्या समस्येत आणखी भर टाकली आहे. मालमत्ता वाढ रद्द करा, साडेतीन लाख फेरीवाल्यांना केंद्राच्या कायद्याचे संरक्षण देऊन परवाने द्या, बेस्टचे वाढीव भाडे रद्द करा, महापालिकेच्या शाळेतील शिक्षणाचा स्तर उंचावण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, टी.बी. व डेंग्यूसारख्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेची रुग्णालये अद्ययावत करा, आदी मागण्या त्यांनी या वेळी केल्या. चांदूरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या मागण्यांसाठी पालिका आयुक्तांची भेट घेतली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages