भाडे नाकारणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाडे नाकारणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

Share This
मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सुमारे १ लाखाच्या वर रिक्षा आणि ४0 हजार टॅक्सी धावतात. या रिक्षा-टॅक्सीचा लाभ मोठय़ा प्रमाणात मुंबईकरांकडून घेण्यात येतो. मात्र, भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, यामुळे प्रवासी त्रस्त होतात. त्याविरोधात वाहतूक पोलिसांकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारीही येतात. अशा टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात वाहतूक पोलिसांकडून वारंवार कारवाईदेखील केली जाते. २0१४च्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत भाडे नाकारण्याच्या ६,९0५ तक्रारी दाखल झाल्या असून दंडात्मक कारवाईतून ५0,१00 रुपये वसूल करण्यात आले आहेत. 

रिक्षा-टॅक्सी चालक नेहमी जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे रिक्शा-टॅक्सी पकडण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. तर अनेकदा जादा भाडे नाकारण्यात आल्यामुळे प्रवासी आणि रिक्षा-टॅक्सी चालकांमध्ये वादही होतात. जादा भाडे आकारणीच्या जानेवारी ते ऑक्टोबर २0१४ या महिन्यांमध्ये २१३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातून ६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर त्या रिक्षा-टॅक्सी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. सध्या जादा भाडे आकारण्याच्या तक्रारीची संख्या मोठी नसली तरी भाडे नाकारण्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात आहेत. खास करून दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळेत आपल्या पसंतीचे भाडे मिळवण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांकडून जवळचे भाडे नाकारले जाते. अनेकदा टॅक्सी-रिक्षामध्ये गॅस नसल्याचेही कारण सांगितले जाते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा भाडे नाकारणार्‍या रिक्षा-टॅक्सी चालकांविरुद्ध मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages