प्रवाशांकडून पावती विना पैसे वसुली - तीन वरिष्ठ तिकीट तपासनिसांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवाशांकडून पावती विना पैसे वसुली - तीन वरिष्ठ तिकीट तपासनिसांना अटक

Share This
मुंबई : टिळकनगर, हार्बर लाइन येथील तिकीट तपासनीस प्रवाशांकडून पैसे घेऊन पावती देत नसल्याच्या तक्रारीवरून सीबीआयच्या अँण्टी करप्शन ब्युरोने टिळकनगर रेल्वे स्थानकातून तिघा तपासनिसांना अटक केली. तत्पूर्वी आरोपींनी पळून जाण्यासाठी पथकातील पोलिसांना मारहाणीचा प्रकार केला.


टिळकनगर या हार्बर लाइनच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तिकिटे तपासणारे तीन तिकीट तपासनीस विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून पैसे घेतात, मात्र त्याची पावती देत नाहीत, अशी गुप्त माहिती सीबीआयच्या अँण्टी करप्शन ब्युरो, कुलाबा यांना मिळाली. या माहितीच्या आधारे १५ जानेवारी सकाळी ६.५५ वाजेच्या सुमारास टिळकनगर रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म क्रमांक २, सीएसटीच्या बाजूच्या टोकाकडे फूट ओव्हरब्रिज येथे तीन इसम काही प्रवाशांचे तिकीट पाहत होते. ज्यांचे तिकीट आहे त्यांना जाऊ देत होते व ज्यांच्याकडे तिकीट नाही त्यांना बाजूला थांबवत होते. त्या प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना पावती देत नव्हते. हा प्रकार पाहिल्यानंतर सीबीआयच्या एसीबीने तिघा तिकीट तपासनिसांना ताब्यात घेतले असता तिघांनी मिळून शासकीय कर्मचारी यांना मारहाण करण्यास सुरुवात करून कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तिघांनी त्यांच्याजवळील पावती पुस्तक व पैसे फेकून दिले. तसेच स्वत:चे कपडे फाडून पळण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र पथकाने त्यांना पकडले. या वेळी तिघांनी पथकातील कर्मचार्‍यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघांविरोधात वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही वरिष्ठ तिकीट तपासनीस म्हणून काम करीत असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास वडाळा रेल्वे पोलीस करीत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages