मुंबई : राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी भवन येथील पत्रकार परिषदेत दिली होती.
राज्यातील महानगरपालिकेच्या एकूण १४ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ६ जागा जिंकल्या तर काँग्रेसने २, भाजपाने २, शिवसेनेने ४ जागा जिंकल्या आहेत. नगरपालिका निवडणुकीत एकूण १0८ जागांपैकी सर्वाधिक ३१ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत ३ उमेदवार निवडून आले आहेत. तसेच काँग्रेस पक्षाने १९, भाजपाने २६ तर शिवसेनेने २0 जागा जिंकल्या आहेत. एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत चांगले यश मिळाले असून आमचा पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. टोलमुक्त महाराष्ट्र, एलबीटी रद्द करणे, शेतीमालाचे हमीभाव वाढवून देणे, यांसाररख्या जनतेला दिलेल्या आश्वासनांपासून आता हे सरकार घूमजाव करत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने या सरकारचे रूप ओळखले असून त्याचाच परिणाम या निकालातून दिसून आल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले.
