मुंबई / प्रतिनिधी - जेष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ व्ही. सुब्रमण्यम यांनी मुंबई विद्यापिठात इंडियन काँग्रेस सायंसच्या एका चर्चा सत्रात मुंबईमध्ये भविष्यात भूकंपाचे धक्के बसतील अशी भिती व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने उत्तुंग इमारतीबाबत निश्चित धोरण तयार करावे अशी मागणी नगरसेवक सुधीर जाधव यानी पालिका आयुक्ताना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.
मुंबई मध्ये ६.२ ते ६.५ रिक्टर स्केलचे मोठ्या तिव्रतेचे धक्के बसण्याची शक्यता व्यक्त करत २३ मजल्यावरील इमारतीना अधिक धोका असल्याने मुंबई मधील गगनचुंबी इमारतीचे बांधकाम थांबवावे असा सल्ला सुब्रमण्यम यानी दिला होता. मुंबईमधे विशेषता २३ मजल्यापेक्षा जास्त उंचीच्या इमारती मोठ्या संखेने उभ्या राहत आहेत. भूकंपाचा धक्का बसल्यास या इमारतींचे नुकसान होऊन मुंबई शहराला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे मुंबई महानगर पालिकेने भूकंपामुळे पुढे होणाऱ्या नुकसानीची दखल घेवुन उत्तुंग इमारतीबाबात योग्य असे धोरण बणवावे अशी मागणी सुधीर जाधव यानी केली आहे.
