दरवाढीमुळे प्रवाशांनी मेट्रोकडे फिरवली पाठ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दरवाढीमुळे प्रवाशांनी मेट्रोकडे फिरवली पाठ

Share This
मुंबई : वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेचे तिकीट दर शुक्रवारपासून दुपटीने वाढल्याने कार्यालयीन दिवसाच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांनी कमी प्रतिसाद दिल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.

मेट्रो मार्गिकेला पहिल्याच दिवसापासून लाखो प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची क्षमता आणि मेट्रोच्या फेर्‍या, यामुळे मेट्रोला सर्वसामान्यांनी पसंती दिल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आले होते. दैनंदिन कार्यालय गाठणार्‍या प्रवाशांनाही सहा महिन्यांत वातानुकूलित प्रवासाची सवय झाली होती. मात्र, गुरुवारी एमएमओपीएलच्या तिकीट दरवाढीला न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर शुक्रवारपासून लगेचच दरवाढ लागू करण्यात आली. शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतील बदल आणि वीकेण्डमुळे नेमका प्रतिसाद स्पष्ट झाला नव्हता. मात्र, सोमवारपासून कार्यालय गाठण्यासाठी नेहमी होणारी गर्दी आणि सोमवारची गर्दी, यात फरक दिसून आला. मेट्रो सुरू झाल्यापासून बेस्टचा तसेच रिक्षाचा पर्याय प्रवाशांनी दुर्लक्षित केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली होती, मात्र सोमवारी काही प्रवाशांनी बसचा पर्याय स्वीकारत घाटकोपर ते अंधेरी व अंधेरी ते घाटकोपर प्रवास करण्यात धन्यता मानली. प्रवाशांनी पुन्हा एकदा जुन्या सार्वजनिक वाहनांचा स्वीकारलेला पर्याय पाहून या मार्गावरील बेस्ट बसच्या कंडक्टरनेही प्रवाशांच्या निर्णयाचे स्वागत केले. 

एमएमओपीएलच्या प्रवक्त्यांकडून मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत आम्ही दिवसभराच्या प्रवाशांची संख्या पाठवू आणि ठरवू, असे सांगण्यात आले. मात्र, प्रमोशनल दरांऐवजी लागू झालेली दरवाढ ही परवडणारी नसल्याचे मत प्रवाशांकडूनच व्यक्त करण्यात आले असून त्यांनी पहिल्याच दिवशी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages