युक्तीमध्येच परिवर्तनाची शक्ती - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

युक्तीमध्येच परिवर्तनाची शक्ती - महापौर

Share This
मुंबई : 'युक्ती' या संकल्पनेखाली राबवण्यात आलेल्या स्पर्धेत कामगारांकडून प्राप्त झालेल्या सूचना व कल्पनांमध्येच परिवर्तनाची शक्ती असल्याचे प्रतिपादन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले. महानगरपालिका व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'मिशन गरिमा' कार्यक्रमांतर्गत कामगारांकडून नवनवीन कल्पना प्राप्त व्हाव्यात, याकरिता आयोजित 'युक्ती' या स्पर्धेत पुरस्कारप्राप्त २0 कामगारांना यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात गौरवण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. 

साफसफाई कामगारांच्या दैनंदिन कामातून व्यक्तीचलित हस्तक्षेप टाळून नवनवीन कल्पना व सूचना कामगारांकडून प्राप्त व्हाव्यात, या उद्देशाने 'युक्ती' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ६,५00 कर्मचारी व कामगारांनी सहभागी प्रवेशिका पाठवल्या. या प्रवेशिकांमधून आयआयटीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी प्रवेशिकांची पडताळणी करून एकूण २0 प्रवेशिकांची पुरस्कारासाठी निवड केली. खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, सिनेअभिनेता जॉन अब्राहम, गायक पंकज उधास व संबंधित महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

मुंबईचे खरे पालक हे रात्रंदिवस काम करणारे ३८ हजार सफाई कर्मचारी आहेत. आपण सर्वांनी मिळून त्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहू या, असे खासदार भालचंद्र मुणगेकर म्हणाले. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त २0 कर्मचार्‍यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. छायाचित्रकार सुधाकर ओलवे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages