पार्किंग धोरणाला अंतरिम स्थगिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पार्किंग धोरणाला अंतरिम स्थगिती

Share This
महापालिकेने संमत केलेल्या 'पे अँड पार्किंग'धोरणाची 'ए' विभागात प्रायोगिक अंमलबजावणी सुरू केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला गुरुवारी अंतरिम स्थगिती दिली. भाजपाचे आ.राज पुरोहित यांच्या मागणीवरून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. 'ए' विभागात 'पे अँड पार्क' धोरण प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यासाठी शिवसेना आग्रही असताना मुख्यमंत्र्यांनी त्याला अंतरिम स्थगिती देऊन भाजपाने सेनेला पुन्हा एकदा काटशह दिला आहे. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी व सुनावणी घ्यावी, असेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नगरविकास विभागाने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पत्र पालिका आयुक्तांना गुरुवारी पाठवले आहे.
 
पालिका सभागृहाने अलीकडेच संपूर्ण मुंबईसाठी 'पे अँड पार्किंग' धोरण संमत केले आहे. या धोरणातंर्गत सोसायटीबाहेरील मोकळय़ा जागा, रस्त्यावर तसेच रस्त्यालगत आणि सार्वजनिक ठिकाणी वाहन पार्क करणार्‍यांना शुल्क मोजावे लागणार आहे. तसेच सोसायटीसमोर, रस्त्यावर रात्रीचे वाहन पार्क करण्यासाठी दरमहा १८00 रुपये चारचाकी वाहनधारकांना मोजावे लागणार आहे. शिवाय सोसायटीतील वाहने दिवसा सोसायटीसमोर आणि रस्त्यावर पार्क करण्यासाठी बंदी घातली आहे. तसे आढळल्यास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवसेनेचे पालिकेतील नेते आणि माजी महापौर सुनील प्रभु यांनीच हे धोरण 'ए' विभागात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याची उपसूचना सभागृहात मांडून ती बहुमताने संमत केली होती. त्या वेळी विरोधी पक्षाने विरोध केला होता. 

'ए' विभागातील रहिवासी, लोकप्रतिनिधी, आमदार आदींनी 'पे अँड पार्किंग' धोरणातील जाचक अटींना कडाडून विरोध केला होता. राज पुरोहित यांनी यासंबंधी मुख्यमंत्र्यांना २0 जानेवारी रोजी पत्र लिहून 'ए' विभागात या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आणि नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी या प्रकरणी तातडीने कार्यवाही करावी व सुनावणी घ्यावी, असेही आदेश दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages