केबल चालकांवर कारवाई होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केबल चालकांवर कारवाई होणार

Share This
मुंबई : प्रत्यक्षात असलेल्या केबल जोडण्या आणि केबल चालकांनी करमणूक विभागाकडून ४(२)(बी)परवाना घेऊन बसवलेल्या केबल जोडण्यांच्या संख्येमध्ये मोठी तफावत आढळून आल्यामुळे मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील केबल चालकांच्या जोडण्यांची सखोल तपासणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही तपासणी मोहीम येत्या शनिवार, २४ जानेवारीपासून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत हाती घेण्यात आली असून रॅण्डम पद्धतीने ही तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आल्यास संबंधित केबलचालक अथवा मल्टीसिस्टीम ऑपरेटर (बहुविध यंत्रणा परिचालक) विरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगर तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये केबल वापरणार्‍यांची संख्या प्रंचड आहे. काही केबल चालक व मल्टीसिस्टीम ऑपरेटर केबल ग्राहकांकडून नियमित करमणूक शुल्क वसूल करतात. मात्र, तो करमणूक कर शासनास भरत नसल्यामुळे शासनाचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. केबल चालक व मल्टीसिस्टीम ऑपरेटरकडून होणारी ही फसवणूक थांबवण्यासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यात प्रत्यक्षात असलेल्या केबल जोडण्या आणि केबल चालकांनी परवाना घेऊन बसवलेल्या केबल जोडण्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. कोकण भवन येथील विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी तिन्ही जिल्ह्यांचे अप्पर जिल्हाधिकारी, केबल चालक तसेच मल्टीसिस्टीम ऑपरेटर यांच्या उपस्थितीत लॉट पद्धतीने केबल चालकाची निवड केली जाणार आहे. यात ज्या केबल चालकाची निवड केली जाईल, त्या केबल चालकाकडे त्याच महिन्यात अचानक तपासणी करण्यात येणार आहे. या वेळी केबल चालकांकडे असलेल्या प्रत्यक्ष केबल जोडण्या आणि त्यांनी परवाना घेताना नमूद केलेल्या जोडण्या यांच्यामध्ये असलेली तफावत आदींचा सर्व्हे केला जाणार आहे.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages