मुंबई / अजेयकुमार जाधव
बेस्ट उपक्रमाच्या आगरे, बस स्थानके, प्रशासकीय इमारती यामध्ये सफाईचे काम करणाऱ्या सुमारे २०० कामगारांना १ जानेवारी पासून नोकरीवरून काढून टाकले आहे. याबाबत कामगार न्यायालयाने ३१ डिसेंबरला जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून न्यायालयाचा अवमान केला आहे अशी माहिती बेस्ट जागृत कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास नलावडे यांनी दिली.
औद्योगिक न्यायालयाने ३० आणि ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी दोन वेग वेगळ्या प्रकरणात ६.६.२००६ पूर्वी बेस्ट मध्ये सफाईचे काम करणाऱ्या ९२ महिला कामगारांना २४ डिसेंबर २००७ पासून उपक्रमाच्या सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. दिनांक ६/६/२००६ नंतर सेवेत आलेल्या महिला कामगार व ज्यांनी २४० दिवस काम केले आहे अश्या कामगारानाही २४० दिवस झाल्यावर सेवेत कायम करून घ्यावे तसेच त्यांची थकबाकी ६ महिन्यात द्यावी असे आदेश दिले आहेत. परंतू तत्कालीन महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी न्यायालयाचा आदेश पायदळी तुडवून सफाई करणाऱ्या २०० कामगारांना १ जानेवारी पासून नोकरीवरून काढून टाकले आहे. तत्कालीन महाव्यवस्थापकांच्या निर्णया विरोधात बेस्ट जागृत कामगार संघटनेने न्यायलयात आव्हान दिले आहे तसेच नवीन महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांची भेट घेवून या प्रकरणी त्वरित लक्ष घालण्याची मागणी केल्याची माहिती नलावडे यांनी दिली.
