मुंबई / अजेयकुमार जाधव
महाराष्ट्रात दिलीप वळसे पाटील यांच्या सारखे असंख्य नेत्यांनी महार वतनी जमिनी गिळंकृत करून त्यावर साखर कारखाने आणि शिक्षण संस्थांचे साम्राज्य उभे केले आहे. अश्या सर्व साखर आणि शिक्षण सम्राटांनी संबंधीत महार वतन जमिनीच्या वारसांना वार्षिक २० टक्के रॉयल्टी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे काका खंबाळकर यांनी केली आहे. या मागणी साठी तसेच झोपडीधारकांच्या विविध प्रश्नासाठी येत्या विधीमंडळाच्या अधिवेशना वेळी राज्यभर आंदोलन करून मोर्चा काढणार असल्याचा इशारा खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत खंबाळकर बोलत होते.
मुंबईच्या महापौर पदासहित अनेक खासदार आणि आमदारांना निवडून आणण्याचे राजकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. परंतू त्यांच्या पश्चात हजारो लाखो कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर उभ्या राहणाऱ्या पक्षाच्या जीवावर फक्त एकाच व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबियांचे कल्याण झाले अशी खंत के. एस. अहिरे यांनी व्यक्त केली. एसआरए योजनेमध्ये अधिकारी आणि राजकीय कार्यकर्त्यांचेच भले होत असल्याने हि योजना म्हाडाने स्वतः राबवावी, सन २०१० पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण द्यावे अश्या झोपड्यांना एसआरए साठी पात्र ठरवावे, एसआरए योजने मधून झोपडी धारकांना ७०० चौरस फुटांचे घर देण्यात यावे अश्या मागण्या यावेळी समाधान नावकर यांनी केल्या.
