मुंबई- एकीकडे मेक इन इंडियाचा नारा देशभरात बुलंद होत असतानाच मुंबई सारख्या भारताच्या आर्थिक राजधानीत महिलांच्या नशिबी शौचालयाची प्राथमिक सुविधादेखील काही ठिकाणी दिसत नाही. या महिलांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आणि या महिलांसाठी ९ आसनी शौचालय उभे राहिले. या शौचालयाचे उदघाटन नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या हस्ते झाले.
सदर विभाग वनविभागाच्या अख्यत्यारित येत असल्यामुळे लोक प्रतिनिधी येथील समस्या दूर करण्यात असमर्थ राहिले. साधा जलवाहिनी फुटीचा प्रश्न असो, वीजेचा प्रश्न असो किंवा शौचालयाची समस्या. स्थानिक लोक प्रतिनिधींनी वर्षानुवर्षे जनतेच्या मागणीला नेहमीच दुय्यम स्थान दिले. हा परिसर डोंगराळ भागात येतो. तसेच येथील झोपडट्टीचा परिसर हा नेहमीच चिंतेचा विषय. गेल्या वीस वर्षांपासून दिंडोशी आणि मालाड (पूर्व) भागातील पिंपरीपाडा, आंबेडकर नगर, कोकणीपाडा, क्रांती नगर, शांतीनगर, तानाजी नगर आणि गायत्री नगर या नगरांमध्ये शौचालय आणि पिण्याचे पाणी हे प्रमुख प्रश्न नागरिकांना भेडसावत होते. अनेक वर्षांपासून येथील नागरीक सोईसुविधांची मागणी करीत आहेत. संख्येने कमी आणि नादुरूस्त शौचालयामूळे येथील महिलांना तर शौचालयासाठी उघड्यावरच जावे लागे. सुमारे १२०० लोकसंख्या असलेल्या या वस्तीत महिलांना दिवसभर ही कुचंबणा सहन करावी लागत असे. मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या निदर्शनास ही समस्या आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना सदर समस्या तात्काळ सोडविण्याचे निर्देश दिले आणि काही महिन्यांतच येथे शौचालय उभे राहिले.
याचदिवशी मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांच्या प्रयत्नाने तयार झालेल्या आणखी २ प्रकल्पांचे उदघाटन देखील करण्यात आले. या विभागातील प्रभाग क्र. ३४ तानाजी नगर,प्रभाग क्र. ३५ क्रांती नगर, प्रभाग क्र.३६ आंबेडकर नगर, प्रभाग क्र.३८ कोकणीपाडा या नगरांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य टाळण्यासाठी १० अश्वशक्ती असणाऱ्या मोटर्स आणि स्टार्टर तसेच १० हजार लीटर क्षमतेचा साठा असणाऱ्या दोन टाक्या कुरार व्हिलेज येथे बसविण्यात आले. या प्रकल्पामुळे २५०० लोकांना कमी दाबाच्या पाण्याच्या प्रश्नापासून दिलासा मिळणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी कोणतेही लोकप्रतिनिधी पद नसताना निव्वळ सामाजिक जबाबदारीच्या बांधिलकीतून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या उपक्रमास उपरोक्त पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त उपविभाग अध्यक्ष सूर्यकांत निकम, दिंडोशी विभाग अध्यक्ष अरूण सुर्वे, महिला विभाग अध्यक्षा वनिता घाग, शाखाध्यक्ष गणपतराव पोकळे, शाखाध्यक्ष विजय बोहरा, महिला शाखाध्यक्षा जयश्री ठसाळे, स्मिता चव्हाण आणि अन्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे.
