`बेस्ट’च्या अर्थसंकल्पाला मंजुरी / मुंबईकरांसाठी 'बुरे दिन' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

`बेस्ट’च्या अर्थसंकल्पाला मंजुरी / मुंबईकरांसाठी 'बुरे दिन'

Share This
मुंबई (प्रतिनिधी) - `अच्छे दिन’ची हमी देत राज्यातही सत्तेत आलेल्या व मुंबई महानगर पालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना- भाजपने मंगळवारी सभागृहात `बेस्ट’च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देतानाच फेब्रुवारी आणि एप्रिल अशी दोनवेळा `बेस्ट’ची भाडेवाढ करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नवीन वर्षात मुंबईकरांना बेस्ट भाडेवाढीचा बोजा सहन करावा लागणार आहे. या भाडेवाढीला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. मात्र सभागृहात अर्थसंकल्पाला महापौरांकडून मंजुरी दिल्यानंतर विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाच्या प्रती फाडून घोषणाबाजी करीत भाडेवाढीचा तीव्र निषेध करीत सभात्याग केला. यावेळी मनसे आणि सपाच्या नगसेवकांनी मात्र पळ काढल्याने विरोधकांमध्ये फुटीचे वातावरण दिसून आले.

पालिका सभागृहात काल बेस्टचा 2015-16 वर्षाचा अर्थसंकल्प मंजुरीसाठी आला होता. 7185.56 कोटींची तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात 946.32 कोटी रु. शिलकी दाखविण्यात आली आहे. मात्र, या शिलकीतून कर्मचार्यांच्या वेतनकरार थकबाकीपोटी 210.61 कोटी आणि कर्ज परतफेड रक्कमेसाठी 735.70 कोटींची तरतूद असून ते वजा करता 1 लाख रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे. या अर्थसंकल्पावर तब्बल दोन दिवस सभागृहात चर्चा रंगली होती. यामध्ये सदस्यांनी बेस्ट प्रशासनाला काही सूचना व मागण्या केल्या आहेत.
बेस्टतर्फे लोकप्रतिनिधी, अंध, अपंग, पोलिस, ज्येष्ठ नागरिकांना सवलत  दिली जाते. इंधन दरवाढ, प्रशासकीय खर्च, वाढत्या महागाईमुळे साधनसामग्रीचे वाढलेले दर, तोटय़ात चालणारा पारिवहन विभाग, केंद्र व राज्य सरकारकडून न मिळणारी टोल माफी यामुळे `बेस्ट’ने अखेर बसच्या प्रवासीभाडय़ात दोन टप्प्यांमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. यावेळी 3000 कोटींपोक्षा जास्तीचा संचित तोटा आणि 2141 कोटींपर्यंत कर्जाची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांमुळे सत्ताधार्यांनी बेस्टला 150 कोटी आणि 1600 कोटींची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. पारिणामी, ही दरवाढ पुढे ढकण्यात आली होती. परंतु, पालिकेला आतापार्यंत 75 कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर उर्वरित रक्कम मार्च 2015 पर्यंत बाकी आहे. त्यामुळे दोन टप्प्यात 1 रुपाये भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळी बोलताना बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर बेस्टचा महसूल वाढविण्यासाठी मुंबईत बीआरटीएस प्रकल्प राबविणे आणि रिक्षा – टॅक्सीवर आरटीओच्या माध्यमातून नियोजन आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच राज्य मार्ग परिवहन महामंडळाप्रमाणे शासनाने बेस्ट उपक्रमालाही आर्थिक अनुदान द्यावे अशी विनंती दुधवडकर यांनी आपल्या भाषणात केली.
दरम्यान, बेस्टची ही भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार आहे. तर, उर्वरीत 1 रुपया भाडेवाढ एप्रिलपासून लागू होणार आहे. बेस्टच्या भाडेवाढीमुळे बेस्टचे सध्या असलेले किमान तिकीट दर 6 रुपायांवरून 7 रु. होणार आहे. तर 1 एप्रिलपासून हेच भाडे 8 रुपये होणार आहे. त्यामुळे अगोदर अच्छे दिनाचे गाजर दाखविणार्या शिवसेना- भाजपा सरकारने गॅस, मेट्रोची तिकीट दरवाढ करून मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले आहेत. त्यातच बेस्टच्या तिकीटदरात वाढ करून पुन्हा कंबरडे मोडले आहे.
किमी सध्याचे 1फेब्रुवारी     1 एप्रिल
टप्पा दर    नवीन दर     नवीन दर
2     6     7           8
4     8     10          10
6     12    13          14
10    15    16          18
14    18    20          22
20    20    25         26
30    25    30         30

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages