प्रत्तेक देशातील राष्ट्रध्वजाचा त्या देशातील नागरिकांनी सन्मान राखला पाहिजे. तसा सन्मान इतर देशातील लोक आप आपल्या राष्ट्रध्वजाचा राखता. परंतू भारतात मात्र आपल्या देशाचा राष्ट्रध्वज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केल्या नंतर रस्त्यावर टाकला जातो. या राष्ट्रध्वजाला लोक पायदळी तुडवत असतात. कित्तेक ठिकाणी आपला तिरंगा राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला पडलेला असतो. गेल्या काही वर्षात तर प्लास्टिकचे राष्ट्रध्वज मार्केट मध्ये आले आहेत. हे प्लास्टिकचे राष्ट्रध्वज कित्तेक दिवस रस्त्यावर पडून राहिले तरी ते नष्ट होत नाहीत.
भारतात सर्वत्र १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. वर्षभर ज्या राष्ट्रध्वजाकडे ढुंकूनही न पाहणाऱ्यांच्याही मनात या दिवशी राष्ट्रप्रेम आलेले असते. हे राष्ट्र प्रेम दाखवण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वैयक्तिक स्वरूपाचा वापर केला जातो. एका दिवसासाठी प्रत्येकाच्या छाताडावर हे राष्ट्रध्वज दिसतात. परंतू दुपार, संध्याकाळ होई पर्यंत हेच छाताडावरील राष्ट्रध्वज कधी रस्त्यावर पडतात हे अश्या लोकांना माहितही नसते. असे रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज उचलण्याची तसदीही हे लोक घेत नाहीत.
शाळा, महाविद्यालये यामध्येही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरे केले जातात. झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यावर विद्यार्थी शाळेबाहेर पडे पर्यंत शाळेमध्ये आणि शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज पडलेले असतात. कित्तेक वेळा विद्यार्थी शाळेबाहेर पडताना या राष्ट्रध्वजाला पायाखाली तुडवत असतात. यामुळे रस्तावर पडून, रस्त्याच्या कडेला धूळ मातीमध्ये पडून, त्याच्यावर लोकांचे पाय पडून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असतो.
राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवावा म्हणून कित्तेक संघटना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरे केल्या नंतर रस्त्यावर पडलेले, रस्त्याच्या कडेला पडलेले राष्ट्रध्वज उचलून त्याची ध्वज संहितेच्या नियमा प्रमाणे त्याची विल्हेवाट लावायचे. राष्ट्रध्वजाचा अवमान थांबवण्याचा जनजागृती करण्याचे काम अश्या कित्तेक संघटनांनी केले. परंतू या संघटनांना केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था याचे म्हणावे तसे सहकार्य मिळाले नसल्याने राष्ट्रध्वजाचा रस्त्यावर पडून होणारा अवमान गेले कित्तेक वर्षे होतच राहिला.
अश्या सर्व प्रकारामुळे आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान थांबवावा म्हणून एका संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने या संदर्भात ४ / ८ / २०१४ व २९ / ९ / २०१४ रोजी अंतरिम आदेश दिले आहेत. तसेच शासनाने (निर्णय क्र. रिटपी. -२६१३/ प्र.क्र.८६/पंरा - ४ दिनांक २६ / ११ /२०१४ ) एक जीआर काढला आहे. या जीआरनुसार प्लास्टिक पासून बनविलेले राष्ट्रध्वज वापरू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
असेच एक परिपत्रक मुंबई महानगर पालिकेनेही काढले आहे. पालिकेच्या शाळामध्ये १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण साजरे करताना विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक स्वरुपात वापरले जाणारे राष्ट्रध्वज शाळेच्या आवारात शाळेबाहेर पडणारा नाहीत याची काळजी शिक्षण अधिकार्यांनी घ्यावी त्यासाठी शाळेच्या स्तरावर समिती स्थापन करावी आणि असे आवारात पडलेले राष्ट्रध्वज संकलित करून त्यांची ध्वज संहितेनुसार विल्हेवाट लावावी असे म्हटले आहे.
तसेच पालिकेच्या सर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्त / खाते प्रमुखांनी आपल्या कार्य क्षेत्रातील नागरीक, माध्यमिक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी, सामाजिक संस्थाना आवाहन करून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. शासन व स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून राज्य सरकार व मुंबई महानगर पालिकेने परिपत्रक काढून आपण न्यायालयाच्या निर्देशानुसार परिपत्रक काढले असल्याचे दाखवले असले तरी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय सण म्हणून सुट्टी जाहीर केलेली असते. मग याची अंमलबजावणी कशी होणार हा प्रश्न आहे.
रष्ट्रीय सुट्टी जाहीर असल्याने त्या दिवशी शासकीय कार्यालयांना सुट्टी असते. सुट्टी असताना शासकीय किंवा पालिकेचे कर्मचारी ध्वज संकलित करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत का ? याचे उत्तर नाही असेल तर हि परिपत्रक आणि जीआर फक्त न्यायालयाला आम्ही तुमच्या आदेशाची अमलबजावणी करतो असे दाखवण्यासाठीच काढले आहेत असे म्हणावे लागेल. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था नुसत्या जीआर आणि परिपत्रक काढून आपल्या जबाबदारी झटकत असले. तरी आपण सर्व या भारताचे एक नागरिक म्हणून आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची गरज आहे.
प्रत्तेक भारतीय नागरिकांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरे करताना आपल्याकडून प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरला जाणार नाही, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, निवासी वस्त्यांमध्ये, रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला एकही राष्ट्रध्वज पडणार नाही. रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला पडलेले राष्ट्रध्वज दिसल्यास ते राष्ट्रध्वज उचलून त्यांची ध्वज संहितेनुसार विल्हेवाट लावायची जबादारी प्रत्तेक नागरिकांनी याची काळजी घ्यायला हवी. आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत्तेक नागरिकांची आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडल्यास सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थाना राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा असे आवाहन करण्यासाठी जीआर, परिपत्रके काढण्याची गरज भासणार नाही.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment