'जस्ट डायल'च्या धर्तीवर पालिकाही समाजोपयोगी 'आधार' सेवा सुरू करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'जस्ट डायल'च्या धर्तीवर पालिकाही समाजोपयोगी 'आधार' सेवा सुरू करणार

Share This

मुंबई : सध्या मार्केटमध्ये एका 'क्लिक'वर उपलब्ध असलेल्या 'जस्ट डायल'च्या धर्तीवर मुंबई महापालिकाही समाजोपयोगी 'आधार' ही सशुल्क सेवा लवकरच सुरू करणार आहे. यापैकी एक सुविधा महापालिकेने विलेपार्ले स्थानकाजवळ सुरू केली असून येथे महापालिकेची देयके भरण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे, मात्र त्यासाठी २0 रुपये शुल्क आकारण्यात येते. शिवाय विलेपार्ले, अंधेरी आणि कांदिवली येथे भाजी विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून विलेपार्ले आणि कांदिवलीच्या केंद्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
वाहनचालक, आया, परिचारिका, केअरटेकर, डे केअर आदी सेवा 'आधार'च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे, असे महापालिकेच्या नियोजन आणि नागरी दारिद्रय़ निर्मूलन कक्षाच्या सहाय्यक आयुक्त प्राची जांभेकर यांनी या विभागाचे विविध प्रकल्प आणि योजनांच्या सादरीकरणाच्या वेळी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. विविध व्यावसायिक क्षेत्रात पारंगत आणि निष्णात असलेल्यांना त्यांच्या सेवा आणि उत्पादनांचे विपणन (मार्केटिंग) करण्याची कला अवगत नसते किंवा त्यासाठी योग्य स्थान मिळत नाही. यामुळे महापालिकेने पुढाकार घेतला असून यासाठी 'आधार'चे जाळे ठिकठिकाणी उभारण्यात येणार आहे. दर्जाचे सातत्य आणि सेवा देण्यासाठी संघटित जाळे, हे आधार केंद्र सुरू करण्यामागील उद्दिष्ट असून त्याचे फलित विलेपार्ले आणि कांदिवलीच्या केंद्रांमध्ये दिसून आले आहे. चांगल्या दर्जाची भाजी योग्य भावात मिळते. यामुळे लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा जांभेकर यांनी केला. मालाड, राठोडी येथे आणखी एक केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेने सुरुवात केली असून तेथील काम प्रगतीपथावर आहे, असे त्या म्हणाल्या. 

'आधार' हा महापालिकेचा 'ब्रँड' झाला पाहिजे, असे प्रयत्न सुरू आहेत. विविध महिला बचतगटांना तसेच विविध गृहोपयोगी आणि तांत्रिक सेवा देणार्‍यांनाही 'आधार'च्या माध्यमातून हजारो ग्राहकांपर्यंत पोहचता येणार आहे. महिला बचतगटांना त्यांच्या विविध उत्पादनांची जाहिरात करून त्यांच्या उत्पादनांच्या दर्जाचे सातत्य राखता येईल, असे जांभेकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, विविध गृहोपयोगी आणि तांत्रिक सेवा देणार्‍यांना त्यांची जाहिरात व माहिती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी पालिका 'पोर्टल'देखील सुरू करणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages