मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील जल व मलनिस्सारण वाहिन्या तसेच बोगद्यांची एखादी व्यक्ती, संस्था व कंत्राटदाराकडून हानी झाल्यास संबंधितांकडून ४00 टक्के दंड वसूल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी होणार्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबईत विविध संस्था, कंत्राटदारांमार्फत रस्ते खणणे, बोअरवेलसाठी खोदकाम इ. कामे सुरू असतात. मात्र या कामाच्या दरम्यान जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, जलबोगदे यांची मोठय़ाप्रमाणावर हानी होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते,मात्र या नुकसानीबाबत खर्च वसूल करणे, दंड आकारणे यासाठी नियमावलीत तरतूद नसल्यामुळे कोणावरही कारवाई करता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने जल आकार व मलनिस्सारण नियमबाह्य सुधारणा करण्याचे ठरवले. या विषयानुसार जल व मलनिस्सारण वाहिन्या फोडणार्या संस्था व कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच खोदकाम करताना पालिकेकडून परवानगी न घेता खोदकाम करताना हानी झाल्यास ४00 टक्के दंड आकारण्यात येणार आहे.
