मुंबई / अजेयकुमार जाधव
पालिका प्रशासनाने जलआकार व मलनिस्सारण आकाराच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचे धोरण आखले आहे. यामध्ये पाणी तसेच मलनिस्सारण करात वाढ सुचवण्यात आली आहे. मात्र याला स्थायी समिती सदस्यांनीच विरोध केल्याने हा प्रस्ताव दफ्तरी दखल करण्यात आला होता परंतू या प्रस्तावात सुधारणा करून पुन्हा प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला आहे. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चिला जाणार असून या प्रसातावाला मंजुरी मिळाल्यास मुंबईकर जनतेवर पाण्याच्या दरवाढीमुळे पाणी पाणी करण्याची वेळ येणार आहे.
मुंबई महानगर पालिकेने दोन वर्षा पूर्वी बजट सादर करताना पाणी करा मधे दरवर्षी 8 टक्के दर वाढ करण्याचे सुचवले होते. सन 2014 मधे लोकसभा आणि विधान सभेच्या निवड्नुका असल्याने स्थायी समिती सदस्यानी हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. आता पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समिती पुढे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तवा नुसार पालिका 1 एप्रिल 2014 पासून ही दरवाढ केली जाणार आहे. या दरवाढी नुसार मागील वर्षाचे ८ टक्के आणि आणि चालू वर्षाचे ८ टक्के असे १६ टक्के नागरिकांकडून वसूल केले जाणार आहेत.
तसेच मलनिःसारण करात देखील २० टक्के वाढ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून हा कर ८० टक्के होणार आहे. यामुळे मुंबईकर जनतेचे पाणी महाग होणार आहे. मुंबईत दरवर्षी सुमारे अडीच हजार बांधकामे नव्याने सुरू असतात. या बांधकामांना पालिकेतर्फे पाणीपुरवठा केला जातो. आतापर्यंत एफएसआयमधून वगळलेल्या भागाचा विचार न करता बांधीव क्षेत्रफळावर पाणी व मलनिःसारण कर आकारणी केली जात असे. यापुढे पोडियम, बहमजली पार्किंग, पॅसेजवर अतिरिक्त जलआकार व मलनिःसारण आकारणी केली जाणार आहे. १ एप्रिलपासून कर आकारणीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
कसे येईल पाण्याचे बिल
ज्यांचे पाणी बिल १००० रुपये येते त्यांना मागील वर्षाचे ८ टक्के व या वर्षीचे ८ टक्के अशी एकूण १६ टक्के दरवाढ केली जाणार आहे.यामुळे यात वाढ होऊन हे बिल ११६० रुपये होईल. पाण्याच्या बिला मध्ये आता पर्यंत ६० टक्के मलनिःसारण कर द्यावा लागत होता आता त्यात २० टक्के वाढ होऊन हा कर ८० टक्के करण्यात आला आहे. पाणी बिला बरोबर मलनिःसारण कर म्हणून ९२८ रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच मुंबईकर नागरिकांना ११६० रुपये पाणी बिल आणि मलनिःसारण कराचे ९२८ रुपये असे एकूण २०८८ रुपये पर्यंत येणार आहे.
