मुंबई - बेस्ट परिवहन सेवेच्या प्रवासीभाड्यात झालेली दरवाढ अन्यायकारक असून, ती तात्काळ मागे घेण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केली आहे.
डिझेलचे दर कमी झाले असताना बेस्टने केलेली भाडेवाढ अत्यंत आश्चर्यास्पद, संतापजनक व तेवढीच लज्जास्पद असल्याचे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते श्री सचिन सावंत यांनी म्हटले आहे. गरिबांच्या खिशातून 10-10 रूपये लुटून ते 10 लाखांच्या सुटासाठी उधळाल तर जनता तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी सत्ताधा-यांना दिला.
बेस्ट भाडेवाढीसंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 60 टक्क्यांहून अधिक कमी झाल्या आहेत. परंतु, भारतीय जनता पक्ष- शिवसेनेच्या सरकारने त्याप्रमाणात भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी केलेले नाहीत. लोकांना दाखवायला म्हणून पेट्रोलियम पदार्थांचे दर किरकोळ प्रमाणात कमी केले मात्र, त्यावरील उत्पादन शुल्क वाढवून ग्राहकांच्या खिशातून पुन्हा जादा पैसे काढून घेतले.
आता बेस्टच्या प्रवासी भाड्यात वाढ करून आणखी लूट सुरू झाली आहे. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे डिझेलचे भाव काही प्रमाणात कमी झाल्यामुळे बेस्टने भाडेकपात करायला हवी होती. परंतु, त्याऐवजी 1 रूपयापासून 10 रूपयांपर्यंत मोठी भाडेवाढ झाल्याने सामान्य नागरिकांवरील आर्थिक बोजा वाढल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेला स्वस्ताईचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात या सरकारने जनतेला महागाई आणि फसवणुकीच्या दु:खाशिवाय दुसरे काहीच दिलेले नाही, असा आरोप काँग्रेस प्रवक्त्यांनी केला.
सत्तेत येताच भाजपने मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत अवास्तव भाडेवाढ करून प्रवाशांना धक्का दिला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाने प्रवाशांसाठी मोठे आंदोलन करून भाववाढ काही प्रमाणात कमी करून घेतली होती. पुन्हा प्रवाशांच्या भावनांशी खेळाल तर त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श्री सचिन सावंत यांनी बेस्टची भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.
