मुंबई- मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क आकारून त्याची माहितीही दडवणा-या साठय़े महाविद्यालयातील प्राचार्या डॉ. कविता रेगे यांच्यावर रविवारी सामाजिक न्याय विभागाकडून फसवणूक आणि अॅट्रासिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाने मागील आठवडय़ातच साठे महाविद्यालयातील या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि संबंधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या व अधिकारी यांनी संगनमत करून २००९ व २०१४ दरम्यान मुंबई विद्यापीठ समाजकल्याण विभागाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून सरकारी आणि विद्यार्थ्यांचीही फसवणूक केल्याचा ठपका प्राचार्यावर ठेवण्यात आला आहे. रेगे यांनी आपल्या महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थ्यां संदर्भात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये कर्तव्ये पार पाडण्यासाठी हयगय केल्याचे पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
साठय़े महाविद्यालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क आकारले जात असल्याची तक्रार मनविसेसह विविध विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. या तक्रारीनंतर विद्यापीठाने एक विशेष चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपली बाजू मांडण्यासाठी संधी दिली होती. परंतु डॉ. रेगे यांनी समितीला कोणत्याही प्रकारे माहिती न देता ती लपवण्याचा प्रकार केला होता, अशी माहिती समिती सदस्यांकडून देण्यात आली होती.
तक्रारदार संतोष धोत्रे यांनी या प्रकरणाचे सर्व पुरावे समितीपुढे ठेवले होते. याच पुराव्याच्या आधारावर मुंबई विद्यापीठाने हे प्रकरण समाजकल्याण विभाग, चेंबूर यांच्याकडे वर्ग केले होते. त्यानंतर समाजकल्याण विभागाने रेगे यांच्याकडे लेखी पुरावा मागितला, त्यासाठी त्यांनी टाळाटाळ केल्यानंतर या विभागानेही एक चौकशी समिती नेमून यातील सत्यता उघड केली.
यात महाविद्यालयाकडून २०१० ते २०१४ या कालावधीत रेगे यांनी बी. एस्सी आयटी, आणि बीएमएम शाखेतील एक हजार ७६ मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्क घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रेगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारी संदर्भात विद्यापीठाकडून कुलगुरूंच्या स्वाक्षरीचे कोणतेही पत्र आम्हाला मिळालेले नाही. समाजकल्याणची तक्रार असती तर त्यालाही आम्ही उत्तर दिले असते. आमच्या कॉलेजात शासकीय जीआरप्रमाणेच विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. या जीआरचे पालन केले जाते. माझ्याविरोधात पोलिसांत काही तक्रार दाखल झाली असली तरी त्याची मला माहिती नाही.
- प्राचार्या डॉ. कविता रेगे, साठय़े महाविद्यालय
