सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्यात विशेष पथक हवे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्यात विशेष पथक हवे

Share This
मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मुंबई शहरातील तरुणपिढी इंटरनेटच्या विळख्यात सापडली असून या तरुणाईला जाळय़ात खेचून दहशतवाद्यांकडून सायबर हल्ले घडवले जाऊ शकतात. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सायबर आपत्कालीन कृती पथक (सीईआरटी) कार्यान्वित करण्यासाठी केंद्र सरकारला साकडे घातले आहे. त्यांनी केंद्रीय माहिती-तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी हा पत्रव्यवहार केला आहे.

तरुणपिढीकडून इंटरनेटचा होणारा अवाजवी वापर चिंतेचा विषय बनला आहे. कारण, या तरुणांना दहशतवादी संघटनांत सहभागी करून घेण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातूनच प्रवृत्त केले जात आहे. कल्याण येथील चार युवकांनाही अशाच पद्धतीने 'इसिस'ने आपल्या कट-कारस्थानात सामील करून घेतल्याचे उघडकीस आले होते. मुंबईत सायबर हल्ल्यांचे सावट गडद बनत चालल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून विशेष सायबर आपत्कालीन कृती पथकाबाबत परवानगी मागितली आहे. मुंबईत इंटरनेटचा वापर करणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे शहरात यापुढे सायबर हल्ले घडवले जाण्याची भीती अधिक असल्याचे मुख्य सचिव (गृह) विजय सत्बीर सिंग यांनी सांगितले. सायबर सुरक्षा भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री वारंवार बैठका घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत केवळ केरळ राज्यात सायबर आपत्कालीन कृती पथक आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही विशेष पथक स्थापन्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages