मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेने सन २००७ ते २०१२ या कार्यकाळात २२७ निवडून आलेल्या व ४ नामनिर्देशित अश्या एकूण २३१ नगरसेवकांना ल्यापटॉप दिले होते. त्या पैकी अद्याप १६ नगरसेवकांनी हे ल्यापटॉप परत दिलेले नाहीत असे माहिती व तत्रज्ञान विभागाने माहिती अधिकारात कळविलेले आहे. या १६ नगरसेवकांनी अद्याप ल्यापटॉप परत केले नसले तरी मुंबई महानगर पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मोहम्मद मुकीम शेख हे एक पत्रकार असून त्यांनी मुंबई महानगर पालिकेकडून नगरसेवकाना देण्यात आलेल्या ल्यापटॉप बाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती. पालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहिती नुसार २३१ नगरसेवकांना ल्यापटॉप देण्यासाठी प्रती ल्यापटॉप ५७ हजार ५६० रुपये या प्रमाणे १ करोड ३२ लाख ९६ हजार ४३३ रुपये इतका निधी खरच करण्यात आला होता. २०१२ मध्ये आपला कार्यकाळ संपल्यावर नियमाप्रमाणे २३१ पैकी १७६ नगरसेवकांनी ल्यापटॉप पालिकेला परत केले आहेत. ३९ नगरसेवकांनी घसारा रक्कम म्हणून प्रती ल्यापटॉप २४ हजार २७५ रुपये पालिकेकडे जमा केले आहेत असे कळविण्यात आले आहे.
तर अद्यापही आयेशा शेख, बाबासाहेब बनसोडे, मोहम्मद फारुख ए आर, प्रेसिला कदम, निर्मला सिंग, इकलाक अन्सारी, संतोष परब, राजेंद्र माहुलकर, सुर्यवंश ठाकूर, जनक संघवी, रोशन दुधवडकर, विलास चावरी, शेख मुहम्मद हुसेन, काशिनाथ कराडकर, विजय वाशिर्डे, शकुंतला माने या १६ नगरसेवकांनी ल्यापटॉप परत दिलेले नाहीत. याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने चिटणीस विभागाकडे पत्रव्यवहार केला असला तरी अद्याप कोणतीही कारवाही झालेली नाही किंवा पालिकेचे ल्यापटॉप या नगरसेवकांनी परत केलेले नाहीत असे कळविण्यात आले आहे.
मुंबई महानगर पालिकेने नगरसेवकांच्या सुविधेसाठी त्यांचा कार्यकाल असे पर्यंत वापर करण्यास ल्यापटॉप दिले होते. आपला कार्यकाल संपल्यावर नगरसेवकांनी हे ल्यापटॉप किंवा त्याची घसारा रक्कम पालिकेला परत करायला हवे होते. ल्यापटॉप परत न करणे हि नगरसेवकांची चूक आहे. या नगरसेवकांकडून पालिकेने कारवाई करून ल्यापटॉप किंवा घसारा रक्कम वसूल करायला हवी.
- देवेंद्र आंबेरकर ( विरोधी पक्ष नेते )
