मुंबई - अभिनेता शाहरूख खान याच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्याच्या बाजूला बांधलेला बेकायदा रॅम्प आज (शनिवार) सकाळी जेसीबी व इतर मशिनरीजच्या साहाय्याने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तोडला.
शाहरूखच्या बंगल्याबाहेरील रॅम्प हटवण्याचे आदेश पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी 5 फेब्रुवारीला दिले होते. त्यानंतर शाहरूखला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अखेर आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज कारवाई करत हा रॅम्प हटविला.
शाहरूखने व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी बंगल्याच्या बाजूला रॅम्प बांधला होता. त्यामुळे रॅम्पलगतच्या रस्त्यात रहदारीला अडथळा निर्माण होतो. हा बेकायदा रॅम्प हटवण्याची मागणी अनेक महिन्यांपासून नागरिक करीत होते. त्याकडे पालिकेच्या विभाग कार्यालयाने दुर्लक्ष केले होते. खासदार पूनम महाजन यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्त कुंटे यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली. त्यानंतर आयुक्तांनी विभाग कार्यालयाला कारवाईचे आदेश दिले.
