भाडेकरू अथवा मालकांना पोलिसांचे ना-हरकत पत्र बंधनकारक नाही - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाडेकरू अथवा मालकांना पोलिसांचे ना-हरकत पत्र बंधनकारक नाही

Share This
मुंबई : घर भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूचे पोलिसांकडून ना-हरकत पत्र घेणे हे बंधनकारक नसून केवळ भाडेकरूची संपूर्ण माहिती पोलिसांना कळवण्यात यावी, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे ना-हरकत प्रमाणपत्रासाठी चिरीमिरी मिळवणार्‍या पोलिसांबरोबरच त्यांच्या मध्यस्थांची देखील गोची झाली आहे. 

घरमालकाने त्याचे घर भाड्याने देताना भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक आहे; परंतु अशी माहिती देण्यासाठी गेलेल्या घरमालक आणि भाडेकरूंनाच पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. 

मालक तसेच भाडेकरूंना यासाठी तासन्तास पोलीस ठाण्यात ताटकळत बसावे लागणे, लहान-मोठय़ा त्रुटी काढून पुन्हा पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावणे, भाड्याच्या करार प्रती मागणे, असे प्रकार पोलिसांकडून होत होते. हे सर्व करून ना-हरकत पत्र देण्यासाठी चक्क चिरीमिरीची मागणी पोलिसांकडून करण्यात येत होती. तसेच घरमालकांना पोलीस ठाण्याचे ना-हरकत पत्र मिळवून देण्यासाठी मध्यस्थी तसेच दलाल मोठय़ा प्रमाणात तयार झाले होते. मात्र यापुढे घरमालकांना घर भाड्याने देण्यासाठी केवळ भाडेकरूची सविस्तर माहिती पोलिसांनी सूचित केलेल्या नमुना अर्जात भरून संबंधित पोलीस ठाण्याला प्रत्यक्ष देण्याव्यतिरिक्त कुरिअर अथवा रजिस्टर पोस्टाने कळवायची आहे, असे राज्य पोलीस महासंचालकांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

भाडेकरूंच्या पोलीस ठाण्यात नोंदणीदरम्यान अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत होते. त्यापासून सुटका व्हावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (तपास), प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages