एमटीएनएलला बेस्टची जागा कवडीमोल भावात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एमटीएनएलला बेस्टची जागा कवडीमोल भावात

Share This
मुंबई : तोट्यात गेलेल्या बेस्टने एमटीएनएलला विस्तारासाठी जोगेश्‍वरीतील मजास आगारातील जागा देताना बाजारपेठेपेक्षा कमी किंमत आकारण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत त्यास काही सदस्यांनी विरोध दर्शवला आहे.

बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा सुमारे ७00 कोटींवर पोहोचला आहे, तर विद्युत विभागाचा नफा परिवहन विभागात हस्तांतर करण्याची भविष्यात शक्यता फार कमी आहे. अशावेळी बेस्टचा आर्थिक गाडा सक्षम करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याऐवजी जुन्या पद्धतीनेच निर्णय घेण्यात येत आहेत. त्याच पद्धतीने महानगर टेलिफोन निगम लिमिटेड़ (एमटीएनएल)चे टेलिफोन एक्स्चेंज जोगेश्‍वरीतील मजास आगारात नेण्यासाठी आकारण्यात येणार्‍या दरांवरून बेस्ट समितीमध्ये विरोध दर्शवण्यात आला आहे. या प्रस्तावात बेस्ट मजास आगारातील भूखंड प्रति चौरस ४८ रुपये प्रति महिना आणि मुक्त विकसित जागेसाठी प्रति चौरस ३३ रुपये प्रति महिना आकारण्याची सूचना करण्यात आली आहे. जोगेश्‍वरीतील विक्रोळी लिंक रोडसारख्या ठिकाणी बेस्टला प्रति महिना केवळ ५३,७0६ रुपये मिळण्याची तरतूद होती. त्यातच या दरांमध्ये वार्षिक वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. अशा प्रकारच्या इतर प्रस्तावात दरवर्षी काही टक्क्यांची वाढ अपेक्षित असते. या पद्धतीची कोणतीही वाढ या प्रस्तावात नसल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे. बाजारपेठेतील दरांनुसार हे दर अल्प असल्याने त्यास विरोधाची भूमिका मनसेचे सदस्य केदार होबाळकर यांच्यासह काही सदस्यांनी घेतली. सर्वसामान्य प्रवाशांवर भाडेवाढ लादताना बेस्ट प्रशासन उत्पन्नाच्या अन्य मार्गावर भर देत नसल्याचा आरोप होंबाळकर यांनी केला. एमटीएनएल बेस्टला सेवा पुरवताना दरांमध्ये तडजोड करत नसल्यास बेस्टने या प्रकाराचा निर्णय घेणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी मत मांडले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages