बम्बार्डियर लोकल रेल्वे अर्थसंकल्पानंतरच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बम्बार्डियर लोकल रेल्वे अर्थसंकल्पानंतरच

Share This

मुंबई : मुंबईकरांच्या सुखद प्रवासासाठी योग्य असलेल्या बम्बार्डियर लोकलचा प्रवास रेल्वे बोर्डाच्या सवलत प्रमाणपत्रावाचून अडकला होता. मात्र रेल्वेमंत्री असलेल्या सुरेश प्रभू यांनी स्वत: या प्रश्नाची दखल घेत हे काम मार्गी लावले आहे. बम्बार्डियर गाड्यांची रुंदी रेल्वे बोर्डाच्या नियमावलीपेक्षा जास्त असल्याने त्याला नियमातून सवलत दिल्याचे प्रमाणपत्र आवश्यक होते. रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वे बोर्डाने ३ फेब्रुवारी रोजी हे प्रमाणपत्र दिले असले तरी रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या गाड्या पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणार आहेत. त्यासाठी आणखी २0 ते २५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे सचिव विनित कुमार यांनी सांगितले. मात्र बुधवारी आठवडाभराचा वादा करणार्‍या रेल्वेने दुसर्‍याच दिवशी ही मुदत महिन्यावर नेऊन ठेवली आहे. 
पश्‍चिम रेल्वे मार्गावर पहिली बम्बार्डियर लोकल २६ जानेवारी रोजी धावेल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्या धावल्याच नाहीत. भारतीय रेल्वेच्या निकषांनुसार गाड्यांची रुंदी १0.५ फूट एवढी असते. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे या निकषांनुसारच तयार होतात. मात्र उपनगरीय रेल्वेच्या डब्यांची रचना वेगळी असल्याने या गाड्यांची रुंदी १२ फूट एवढी असते. वास्तविक सिमेन्स कंपनीच्या गाड्यांची रुंदीही १२ फूट एवढीच होती. त्या वेळीही हे सवलत प्रमाणपत्र घेण्याची गरज भासली होती, असेही विनित कुमार यांनी सांगितले. बम्बार्डियर लोकलसाठी हे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया खूप आधी सुरू झाली होती. मात्र त्या प्रक्रियेला म्हणावी तशी गती मिळत नव्हती. अखेर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हस्तक्षेप करत या प्रमाणपत्रासाठीचा मार्ग सुकर केला. आता रेल्वे बोर्डाने ३ फेब्रुवारी रोजी हे सवलत प्रमाणपत्र दिले आहे. मात्र तरीही मुख्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे आणि त्यानंतर मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय ही गाडी धावणार नाही. या सर्व कागदपत्रांच्या कामांसाठी किमान २0-२५ दिवस लागणार आहेत. त्यामुळे ही लोकल आता रेल्वे अर्थसंकल्पानंतरच प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages