बेस्ट दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या रणरागिणींचं आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या रणरागिणींचं आंदोलन

Share This
मुंबई – बेस्टनं मुंबईकरांच्या माथी मारलेल्या अन्याय्य दरवाढीचा सोमवारी मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला. सोशिक मुंबईकरांवर ही दरवाढ लादणं अत्यंत चुकीचं आहे. अशा रीतीनं प्रवास महाग करण्यापेक्षा बेस्ट आणि महापालिका यांनी सेवा तोट्यात जाऊ नये, यासाठी योग्य पावलं उचलावीत अशी मागणी या वेळी करण्यात आली. 


मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन हाती घेण्यात आलं होतं. सीएसटी बसडेपो येथे झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी या दरवाढीबद्दल मुंबईकरांच्या मनात निर्माण झालेल्या असंतोषाला वाचा फोडली. १ फेब्रुवारीपासून बेस्टचा प्रवास महागला आहे. एप्रिलमध्ये पुन्हा दरवाढ प्रस्तावित आहे. ही दरवाढ अत्यंत चुकीची आहे, असा दावा करताना बेस्ट तोट्यात आहेच कशी, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला. बेस्ट उपक्रम मुंबई महानगरपालिकेचाच भाग आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून बेस्टला तोट्यातून सावरण्यासाठी १५० कोटी रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र फक्त ३७ कोटी ५० लाख रुपयेच आतापर्यंत देण्यात आले आहेत. त्यामुळेच भाडेवाढ करावी लागल्याचं वाघ यांनी सांगितलं.

तोट्यातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमाला स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचे अन्य मार्गही उपलब्ध आहेत. पण या स्रोतांकडे दुर्लक्ष केलं जातंय, असं चित्रा वाघ यांनी नमूद केलं. अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मुंबई आणि उपनगरांतल्या सुमारे २ हजार बस स्टॉपचं उदाहरण त्यांनी या संदर्भात दिलं. या स्टॉपवरील जाहिरातींद्वारे बेस्टला चांगलं उत्पन्न मिळू शकेल. सध्या तिथे जाहिराती झळकावण्यासाठी बेस्टकडून फक्त ५०० रुपये घेतले जातात. बाजारभावानं तिथे जाहिरातीसाठी १५ ते २० हजार रुपये सहज मिळू शकतात. यातून बेस्टचं उत्पन्न भरघोस वाढू शकतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

बेस्ट मुंबईकरांना काय देते? 
बेस्ट प्रवाशाला दिलेल्या प्रत्येक तिकीटापोटी १५ पैसे अधिभार घेतला जातो. या अधिभाराचा हिशोब मात्र साडे चार वर्षांपासून देण्यात आलेला नाही. तो कधी देणार असा प्रश्न करतानाच बेस्टचा कारभार हा मुंबईकरांच्या सोयीचा विचार करून होत नाही, असा थेट आरोप चित्रा वाघ यांनी केला. दरवाढही सहन करणाऱ्या सोशिक मुंबईकरांना बेस्ट काय देणार? नवे मार्ग ठरवताना प्रवाशांची नाही तर बेस्ट आपलीच सोय विचारात घेते. महिला प्रवाशांच्या सोयीसाठी चालवण्यात येणाऱ्या सेवाही समाधानकारक नाहीत. गर्दीच्या वेळी महिलांना होणारा त्रास पाहिला, तर बेस्टच्या महिला विशेष सेवा समाधानकारक नसल्याचं सहजच लक्षात येतं, असं सांगतानाच चित्रा वाघ यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या पासमध्ये झालेली जवळपास दुप्पट दरवाढ तातडीनं मागे घ्यावी, अशी मागणीही केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages