सोशल मीडियाने जग जवळ आणले खरे, पण या माध्यमांचा वाढता वापर सध्या मुंबई पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला आहे. एखादी अनुचित घटना घडली की, त्या घटनेची लागलीच बातमी पसरवण्याची चपळाई सोशल मीडियाच्या माध्यमातून होऊ लागली आहे. यातून अनेकदा अफवांना ऊत येत असल्याने पोलिसांनी आता सुशिक्षित तरुणांची मदत घेऊन सोशल मीडियावर 'वॉच' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी अलीकडेच सर्व पोलीस ठाण्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी स्थापलेल्या समित्यांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
आता नव्याने समित्या स्थापून त्यात तरुण, सुशिक्षित लोकांना अंतर्भूत करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि जनतेचा सहभाग असलेल्या समित्या स्थापन केल्या जातात. या समित्यांत सुशिक्षित तरुणांची नियुक्ती केल्यामुळे त्यांची सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्यास मोठी मदत होणार आहे. अशा समित्यांतील तरुण सदस्यांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच प्रक्षोभक मजकूर पसरवला जात असल्याचे निदर्शनास आल्यास ते सदस्य पोलिसांना कळवतील. त्यानंतर पोलीस वेळीच पुढील कारवाईची पावले उचलतील. परिणामी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे डीसीपी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. सध्याच्या समित्या, ग्रुप्सचा आढावा घेतल्यानंतरच नव्या समित्यांची स्थापना केली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापण्यात येणार्या या समित्यांत तरुण, सुशिक्षित लोकांना अंतभरूत करून घेण्याचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
