मालमत्ता कर प्रस्ताव = अँडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेतल्याशिवाय चर्चेला आणू नये - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मालमत्ता कर प्रस्ताव = अँडव्होकेट जनरल यांचा सल्ला घेतल्याशिवाय चर्चेला आणू नये

Share This
मुंबई : मालमत्ता कराचा प्रस्ताव राज्याचे महाधिवक्ता (अँडव्होकेट जनरल) यांचा सल्ला घेतल्याशिवाय महापालिकेने चर्चेला आणू नये, अशी मागणी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार अँड़ आशिष शेलार यांनी पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांना बुधवारी भेटून केली. मुंबई महापालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता असूनही भाजपाने मालमत्ता करावरून आता टोकाची भूमिका घेऊन सेनेला अडचणीत आणण्याचा चंग बांधला असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. 
अँड़ शेलार यांनी बुधवारी पालिका आयुक्तांकडे या प्रकरणी बैठक घेऊन चर्चा केली. या वेळी भाजपाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक आणि पक्षाचे अन्य नगरसेवक उपस्थित होते. मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोजा चुकीच्या पद्धतीने लावल्यास भाजपाचा त्याला विरोध असेल आणि मुंबईकरांसाठी भाजपा कायदेशीर लढा लढेल, असा इशाराही त्यांनी दिला. पूर्वीची बाजार मूल्याधारित मालमत्ता कर पद्धती बंद करून भांडवली मूल्याधारित नवीन कर पद्धती १ एप्रिल २0१0 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यावर आक्षेप घेऊन हा प्रस्ताव न्यायालयात गेला. या नव्या कर पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता पालिकेनेही त्यात सुधारणा केली आहे, मात्र यामुळे मालमत्ता कराचा मोठा बोजा मुंबईकरांवर पडणार आहे, असा आक्षेप विरोधी पक्षासह भाजपानेही घेऊन या नव्या कर पद्धतीला विरोध केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages