मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( एमपीएससी )जुलै 2014 मध्ये लेखी परीक्षेत उत्तीर्ण उर्दू विषयांच्या 12 प्राध्यापकांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनतर आणखी सहा अतिरिक्त गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी जाहीर करत त्यांच्याही डिसेंबर 2014 मध्ये मुलाखती घेतल्या. मात्र, दोन्ही मुलाखतींचा निकाल अद्याप गुलदस्तातच आहे. त्यामुळे संभ्रमावस्थेतील उर्दू प्राध्यापकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
महाविद्यालयीन शाखा गट "अ‘ प्राध्यापक पदासाठी उच्च तंत्रशिक्षण विभागातील विविध विषयांच्या एकूण 25 पदांची जाहिरात जुलै 2013 मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर एकूण 25 विषयांच्या लेखी परीक्षा घेतल्या. गुणवत्तेप्रमाणे उमेदवारांचे निकाल संकेतस्थळावर जाहीर केले. 21 जुलै 2014 ला उर्दू विषयांच्या मुलाखती झाल्या. या मुलाखती इतर विषयांच्या अगोदर घेण्यात आल्या होत्या. इतर विषयांचा निकाल आयोगाने जाहीर केला. मात्र, आयोगाने उर्दूचा निकाल जाहीर केला नाही. हे कमी की काय म्हणून आयोगाने उर्दू विषयांच्या आणखी सहा अतिरिक्त गुणवताधारक उमेदवारांची यादी 27 नोव्हेंबर 2014 ला जाहीर करत मोठा हादरा दिल्याची भावना उमेदवारांमध्ये तयार झाली आहे. अतिरिक्त उमेदवारांच्या मुलाखती 15 डिसेंबर 2014 ला घेतल्याने उमेदवारांमध्ये संशयाची पाल चुकचुकू लागली आहे. दरम्यान, आयोगाचा निकाल लागेल, या आशेवर असलेल्या 18 प्राध्यापकांमध्ये दुसरीकडे अर्ज करावे की नाही? अशी द्विधा मनःस्थिती आहे. राज्यातील खासगी महाविद्यालयांच्या जाहिराती येत असल्याने उमेदवारांमधील धास्ती वाढली आहे.
