मराठी भाषा कार्यक्रमास शिवसेना, मनसेची अनुपस्थिती! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मराठी भाषा कार्यक्रमास शिवसेना, मनसेची अनुपस्थिती!

Share This
मराठी बाणा व मराठीचा कळवळा हवा, मराठीची गळचेपी होतेय, माय मराठी.. असा मराठीचा वारंवार 'उदो उदो' करून राजकीय पोळी भाजणार्‍या महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी या पक्षांच्या नगरसेवकांनी प्रामुख्याने मराठी भाषिक नगरसेवकांनी 'मराठी भाषा पंधरवडा' निमित्त पालिकेत आयोजित कार्यक्रमास अनुपस्थित राहून आपले मराठीबद्दलचे 'प्रेम' व्यक्त केले. 

हाताच्या बोटांइतकेच, मोजकेच मराठी नगरसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यात महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा पूजा महाडेश्‍वर, स्वीकृत नगरसेवक अवकाश जाधव यांचा समावेश होता. महापालिकेत २२७ पैकी ७0 टक्के नगरसेवक मराठी असूनही, मराठी भाषेसमोर नतमस्तक होण्याची इच्छा केवळ १0 नगरसेवक आणि एका नामनिर्देशित सदस्याला झाली. 'मराठी झेंडा घेऊ हाती' असा टेंभा मिरवत फिरणार्‍या शिवसेनेच्या असंख्य नगरसेवकांनी आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांच्यासह बर्‍याच मराठी नगरसेवकांनी या कार्यक्रमाला गैरहजर राहण्यातच 'धन्यता' मानली. मनसे व शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी आपापल्या विभागांमध्ये 'मराठी भाषा दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पण ते सायंकाळी सुरू झाले. मात्र पालिकेचा हा कार्यक्रम दुपारी असूनही मराठी नगरसेवकांनी पालिका मुख्यालयात न फिरकता, 'आम्हास काय त्याचे' हे आपल्या कृतीतून दर्शवले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages