मुंबई : येत्या शनिवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार्या उच्च माध्यमिक आणि मंगळवार, ३ मार्चपासून सुरू होणार्या माध्यमिक शालान्त परीक्षेस बसणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानापासून नियोजित परीक्षा केंद्रापर्यंत बसगाडीमधून प्रवास करताना कोणतीही गैरसोय होऊ नये व नियोजित वेळी परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, याकरिता बेस्ट उपक्रमातर्फे परीक्षा कालावधीमध्ये बसगाड्यांची सुविधा देण्यात येणार आहे.
त्यामुळे १0वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे शालेय - कनिष्ठ महाविद्यालयीन प्रवासाकरिता असलेले बेस्ट उपक्रमाचे बस पास असतील, त्यांना त्या बस पासवर परीक्षा कालावधीमध्ये निवासस्थान ते परीक्षा केंद्रादरम्यान प्रवासाची सवलत देखील देण्यात येणार आहे. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालान्त परीक्षा क ालावधीमध्ये परीक्षा केंद्र प्रवेशपत्र (हॉल तिकीट) निवासस्थान ते परीक्षा केंद्र या प्रवासादरम्यान बसवाहकास दाखवल्यास सवलतीचे प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रानजीकच्या बस थांब्यावर बस निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार असून बसवाहक, बसचालक तसेच बस निरीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रवासात सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना बेस्ट प्रशासनाने दिलेल्या आहेत.
