मुंबई : महिलांवरील अत्याचारांच्या घटना पुरोगामी महाराष्ट्रात वाढत चालल्या आहेत. मुंबईतला सामूहिक बलात्कार असो किंवा लातूरजवळ निघालेली महिलेची धिंड... लहान मुलीही या युती सरकारच्या राजवटीत सुरक्षित राहिलेल्या नाहीत. महिलांविरोधी वाढते गुन्हे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहता हेच का अच्छे दिन, असा प्रश्न पडतो. फडणवीस सरकार शंभर दिवस पूर्ण करतंय. पण याचा आनंदोत्सव साजरा करण्यापेक्षा सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे गांभीर्यानं पहावं. अन्यथा या सरकारची शंभरी भरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज दिला.
महिलांविरोधी अत्याचार रोखण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरलंय. सरकारला जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसनं चर्चगेट स्थानकासमोर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन केलं. महिलांच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटीची वेळ मागितली. मात्र मुख्यमंत्र्यांकडे महिला आयोगाच्या सदस्यांना भेटायला वेळच नाही, असा आरोप या वेळी चित्रा वाघ यांनी केला. सरकारला १०० दिवस पूर्ण होताना महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली, असा सवालही त्यांनी केला. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कोकण विभाग संघटक आदिती तटकरेही या वेळी उपस्थित होत्या.
या आंदोलनात मुंबई महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष सोनल पेडणेकर, मनिषा गांगण, शारदा गायकर, जिल्हाध्यक्ष वंदना माने, उमा भास्करन, कांचन लाड, फेमिदा खान तसंच प्रिया बांदिवडेकर, सलमा हिंगोरा, गायत्री सावंत, सानिका शिरगावकर, चंदन साळुंके, स्वाती माने आदींनीही सहभाग घेतला.
