मुंबई - मुंबईकर जनता कराच्या बोज्याखाली दबली असताना मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांच्या ड्रायव्हरच्या पगारावर आणि ओव्हर टाइमवर वर्षाला तब्बल २६ लाख रुपये खर्च केले असल्याची माहिती किशोर जोशी यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारातून उजेडात आली आहे. मुंबई महानगर पालिकेकडून महापौरांच्या ड्रायव्हरला दिला जाणारा पगार पाहता हा ड्रायव्हर नक्की गाडी चालवतो की विमान चालवतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून मान असलेल्या महापौरांच्या दिमतीला ३ वाहने असून १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत महापौरांच्या वाहनासाठी २०९२ लिटर एवढय़ा इंधनाचा वापर करण्यात आला. इंधन वापरासाठी यंदा २ लाख ८० हजार ७८६ रुपयांचा खर्च करण्यात आला होता.
विशेष म्हणजे एक वर्षाचे महापौरांच्या तीन वाहनचालकांचे ओव्हरटाईम हे १३ लाख ९४ हजार रुपये एवढे असून या सर्वासाठी तब्बल वर्षाकाठी २६ लाख रुपये खर्च केले जातात. महापौरांच्या दिमतील असलेल्या तीन वाहनांत एक त्यांच्या स्वत:साठी, एक त्यांच्या कुटुंबासाठी आणि एक सुरक्षारक्षकांसाठी असा त्यांचा ताफा असतो. महापौरांच्या वाहनासाठी जिथे २६ लाख रुपये खर्च केले जातात, तिथे उपमहापौरांच्या वाहन खर्चासाठी १० लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याची किशोर जोशी यांनी मागवलेल्या माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
दरम्यान, महापौर हे चालकाचे पगार ठरवत नसतात, तर पालिका ठरवत असते, त्यामुळे मी केलेली उधळपट्टी नाही असं स्पष्टीकरण सुनील प्रभू यांनी दिलं.तर मुंबईकरांवर एकीकडे करवाढीचा बोजा वाढत असताना मुंबई महापौरांनी वाहनांतून फिरत पालिकेच्या तिजोरीतील पैशावर उधळपट्टी करणे योग्य नसून महापौरांनी, महापालिकेची पुढील आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी स्वत:पासून काटकसर करायला हवी होती, अशी टीका काँग्रेसच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
