अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍यांवर कारवाई करा - हायकोर्टात जनहित याचिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अपंगांच्या डब्यात घुसखोरी करणार्‍यांवर कारवाई करा - हायकोर्टात जनहित याचिका

Share This
मुंबई : उपनगरी लोकलच्या अपंगांच्या डब्यात बेकायदा शिरकाव करून अपंग प्रवाशांना त्रासदायक स्थिती निर्माण करणार्‍या प्रवाशांवर कारवाई करा, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. घाटकोपर येथील रहिवासी नितीन गायकवाड यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर द्विसदस्यीय खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

अपंगांच्या डब्यात बेकायदा प्रवास करणार्‍या प्रवाशांत पोलीस कर्मचारी तसेच अन्य सरकारी नोकरदारांचाही समावेश असल्याचे गायकवाड यांनी याचिकेत नमूद केले आहे. ५0 टक्के अपंगत्व असलेले गायकवाड हे माहिम येथील कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी नेहमी पश्‍चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरील लोकलने प्रवास करतात. अपंगांच्या डब्यातून बेकायदा प्रवास करणार्‍या प्रवाशांमुळे आपल्यासारख्या अपंगाला लोकलमधून चढणे-उतरणे नेहमीच धोकादायक बनत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. राखीव डब्यातून पोलीस, जीआरपी, आरपीएफ जवान आणि रेल्वेचे कर्मचारीही प्रवास करत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वे प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. सप्टेंबर २0१३मध्ये गायकवाड यांच्या तक्रारीवर राज्य अपंग विभागाच्या आयुक्तांनी अपंगांच्या राखीव डब्यातून प्रवास करणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा आणि अपंग प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकार्‍याची नियुक्ती करण्याचा आदेशही रेल्वे प्रशासनाला दिला होता. मात्र, त्या आदेशालाही प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages