५०० कोटींची सुधारित तरतूद करत पालिका अर्थसंकल्प मंजूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

५०० कोटींची सुधारित तरतूद करत पालिका अर्थसंकल्प मंजूर

Share This
शिवसेनेला १४० तर महापौरांना १०० कोटींचा निधी 
मुंबई -  मुंबई महानगर पालिकेच्या ३३ हजार ५०० कोटींचा अर्थसंकल्पात आणखी ५०० कोटींची सुधारित विकासकामांची तरतूद करत स्थायी समितीच्या बैठकीत सन २०१५-१६च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये बेस्टला यंदा भंगारात निघणा-या ३०० बस देण्याची तरतूद करण्यात आली आहे.  प्रत्येक सदस्याला एक कोटी रुपये, स्थायी समिती सदस्यांना प्रत्येकी ५० लाख आणि विविध राजकीय पक्षांना अडीच ते सात कोटी रुपयांचा निधी देताना सत्ताधारी शिवसेनेने मात्र १४० कोटी रुपयांचा निधी स्वताच्या पदरात पाडून घेतला. 

२२७ नगरसेवकांना १ कोटी रुपयांचा विकास निधी, रेसकोर्सवरील थीमपार्कसाठी ५ कोटी रुपये, डबेवाला भवनासाठी २ कोटी रुपये, कस्तुरबा रुग्णालयातील साथीच्या आजारांसंदर्भातील प्रयोगशाळेप्रमाणे पूर्व व पश्चिम उपनगरातही प्रत्येकी एक प्रयोगशाळा बांधणे, कला व सांस्कृतिक भवनासाठी २ कोटी रुपये, माथाडी भवनसाठी २ कोटी रुपये, आरे कॉलनी येथे गणेश विसर्जन तलावाचे सुशोभीकरण व मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये असलेल्या चौकांचे सुशोभीकरण ८ कोटी अशा प्रकारे विविध विकासकामांचा अंतर्भाव अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाला १ कोटी रुपये, ५० लाख रुपये आणि नगरसेवक निधी ६० लाख अशा प्रकारे स्थायी समिती सदस्यांना २ कोटी १० लाखांचा निधी मिळणार असून केवळ नगरसेवकाला १ कोटी ६० लाखांचा निधी मिळणार आहे. मात्र महापौरांना सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. महापौरांना मिळणाऱ्या निधी मधून महापौर कोणत्या नगरसेवकांना हा निधी देतात याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पामुळे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि विविध पक्षांचे गटनेते यांना सर्वात अधिक विकास निधी मिळणार असल्यामुळे गटनेत्यांसह स्थायी समिती सदस्य मालामाल होणार आहेत. 
बेस्टला ३०० बस महापालिकेच्या वतीने देण्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बेस्टच्या तिकीट दरात वाढ केली जाऊ नये म्हणून मागील वर्षी महापालिकेच्या वतीने १५० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. परंतु या वर्षी हे अनुदान न देता बस खरेदी करून देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages