महिला रेल्वे प्रवाशांच्या रक्षकांची हजेरीपूर्वी होणार तपासणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिला रेल्वे प्रवाशांच्या रक्षकांची हजेरीपूर्वी होणार तपासणी

Share This

मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्‍या महिलांच्या डब्यात रात्रीच्या वेळी तैनात असलेल्या होमगार्ड्स आणि रेल्वे पोलिसांनी मद्यप्राशन करून ड्युटीवर जाऊ नये, यासाठी आता रेल्वे पोलीस आयुक्तांनी कठोर पावले उचलली आहेत. ड्युटीवर जाण्यापूर्वी संबंधित होमगार्ड्स आणि जीआरपी कॉन्स्टेबल्सची तपासणी करण्यात यावी, यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सूचना जारी केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात पश्‍चिम रेल्वेवरील एका लोकलमध्ये कैलास मोरे नावाचा होमगार्ड दारूच्या नशेत आढळला होता. तो असभ्य भाषा वापरत होता. या प्रकाराची रेल्वे पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. रात्रपाळीला महिलांच्या डब्यात तैनात केल्या जाणार्‍या सुरक्षा रक्षकांची जीआरपी आऊटपोस्टवर हजेरी लावताना तपासणी केली जाणार आहे. संबंधित सुरक्षा रक्षकाने मद्यप्राशन केले आहे का, हे जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी त्याच्याशी समोरासमोर संभाषण करणार आहेत. महिलांच्या डब्यात तैनात असलेले सुरक्षा रक्षक अनेकदा मद्यधुंद असतात, अशी तक्रार महिला प्रवासी करतात. गेल्या वर्षी रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार्‍या रक्षकांनी मद्यप्राशन केल्याचे दोन वेळा उघडकीस आले होते. उपनगरीय लोकलच्या महिलांच्या डब्यात रात्री ८.३0 ते सकाळी ६ वाजेपर्यंत जीआरपी कॉन्स्टेबल्स आणि होमगार्ड्सना तैनात केले जाते. या सुरक्षेसाठी जीआरपीला जवळपास ५00 होमगार्ड्स देण्यात आले आहेत. पण यातील निम्मे होमगार्ड्स विकेण्डला ड्युटीवर फिरकत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. होमगार्ड्सना अटकेचा अधिकार नाही. ते गुन्हेगारांसंदर्भात नजीकच्या जीआरपी आऊटपोस्टला खबर देऊ शकतात, असे रेल्वे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. ड्युटीवर येणार्‍या होमगार्ड्स तसेच जीआरपी कॉन्स्टेबल्सनी मद्यप्राशन केले का, हे जाणून घेण्यासाठी तपासणी केली जाणार असल्याने महिला प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages