महाराष्ट्राला गुजरातच्या मागे फेकण्याचे मोदी-फडणविसांचे स्वप्न - माणिकराव ठाकरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्राला गुजरातच्या मागे फेकण्याचे मोदी-फडणविसांचे स्वप्न - माणिकराव ठाकरे

Share This
मुंबई - महाराष्ट्राला मागे टाकून गुजरातला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संयुक्त स्वप्न असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत प्रस्तावित असलेले भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अर्थात इंटरनॅशनल फायनान्स सेंटर गुजरातला पळविण्याच्या निर्णयासंदर्भात प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. 

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबईला मोठे महत्व आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कंपन्यांसह भारतातील प्रमुख कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालये मुंबईत आहेत. मुंबईचे महत्व लक्षात घेऊनच काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशातील पहिले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतच स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हे केंद्र आता गुजरातला हलविण्याचा निर्णय झाल्याचे प्रसारमाध्यमांमधून प्रकाशित झाले आहे. हा प्रकार मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याच्या षडयंत्राचा एक भाग असल्याचे श्री ठाकरे म्हणाले.

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून सातत्याने महाराष्ट्र व मुंबईचे महत्व कमी करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याबद्दल चकार शब्द काढायला तयार नसल्याने महाराष्ट्राला गुजरातच्या मागे फेकण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हातभार लावत असल्याचे स्पष्ट होते.

भाजपचे केंद्र सरकार व गुजरात सरकारने संगनमताने महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अगोदर दमणगंगा व पिंजर प्रकल्पातील गोदावरीचे 100 टीएमसी पाणी गुजरातला पळवून नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. मुंबई बंदरातील घनवाहतूक बंद करण्यात आली आहे. पालघरनजीक होणारे कोस्ट गार्ड प्रशिक्षण केंद्र गुजरातमधील द्वारकेला पळविण्यात आले आहे. एअर इंडिया आणि रिझर्व बॅंकेची कार्यालयेही अशात पद्धतीने पळविण्याचा कट यापूर्वीच उघड झाला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलविण्याची मागणी गुजरातच्या भाजप खासदारांनी संसदेमध्ये मांडली आहे, अशी अनेक उदाहरणे देत गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल मुंबईत येऊन येथील उद्योजकांना जाहीरपणे महाराष्ट्र सोडण्यासाठी चिथावणी देतात, यापेक्षा अधिक दुर्देवी काय असू शकते, असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.श्री ठाकरे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातही भारतीय जनता पक्षाचेच सरकार असून, येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणांबाबत बाळगलेले मौन राज्याच्या हिताचे नसून, त्यामुळे मुंबईचे महत्व कमी करण्याच्या कटात ते देखील सहभागी होत असल्याचे दिसून येते असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages