दंडाची रक्कम माहिती अधिकार कार्यकर्त्याला नुकसान भरपाई म्हणून मिळणार
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्या एल ते टी विभाग कार्यालयातील रस्ते विभागातील अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवूनही माहिती दिली नसल्याने या अधिकाऱ्यांकडून ५३ हजार रुपयांचा दंड वसूल करावा व हा वसूल केलेला दंड नुकसान भरपाई म्हणून माहिती अधिकार कार्यकर्त्याला द्यावेत असे आदेश माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत.
महानगर पालिकेद्वारे मुंबई पूर्व उपनगरातील एल ते टी विभागात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या कामासंदर्भात माहिती अधिकारात ऑक्टोंबर २०१४ मध्ये एकूण १४ अर्ज माहिती मागितली होती.याबाबत पैसे भरूनही माहिती देण्यात आलेली नव्हती. पैसे भरूनही माहिती दिली नसल्याने घाडगे यांनी नोव्हेंबर मध्ये प्रथम अपील दाखल केले. या अपिला बाबत सुनवाई दरम्यान सात दिवसात माहिती देण्याचे आदेश अपील अधिकाऱ्यांनी दिले तरीही माहिती देण्यात टाळाटाळ करण्यात आली होती.
यामुळे घाडगे यांनी राज्य माहिती आयोगाकडे अपील दाखल केले होते. या प्रकरणाची गभीर दखल घेत रस्ते विभागाच्या एम पूर्व व एल विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जे. बनसोडे यांना आठ प्रकरणात ८ हजार रुपये दंड माहिती करता भरलेले ६२ रुंपये, एन व एम पश्चिम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. हेर्लकर यांना तीस हजार रुपये दंड माहितीसाठी भरलेले १५० रुपये, एस व टी विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. निघोट यांना तीन प्रकरणात १५ हजार रुंपये दंड व माहितीसाठी भरलेले १२२ रपये असे एकूण ५३ हजार ३३४ रुपये पालिका आयुक्तांनी वसूल करून हि नुकसान भरपाई माहिती अधिकार कार्यकर्ते निशांत घाडगे यांना द्यावेत असे आदेश दिले आहेत.
