मरीन ड्राईव्हवरील पारंपरिक दिवे काढून त्याजागी एलईडी दिवे लावण्यावरून भाजपा आणि शिवसेनेत याआधीच मतभेद झाले असताना गुरुवारी याच मुद्दय़ावरून शिवसेनेच्या मदतीला मनसे धावली आणि भाजपाच्या एलईडी दिव्यांचा 'फ्युज' काढून त्यांची कोंडी केली. एलईडीची चर्चा पालिकेच्या महासभेत सुरू झाल्यानंतर मनसे, शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमकी सुरू होत्या. अखेरीस पालिकेच्या आयुक्तांना सभागृहात पाचारण करण्यात आले. महापालिका सभागृह आणि स्थायी समितीच्या मान्यतेनेच एलईडी दिव्यांबाबतचे कंत्राट देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण सीताराम कुंटे यांनी दिल्यावर सभागृहातील तापलेले वातावरण निवळले; पण आयुक्तांनी यासंदर्भात केलेले स्पष्टीकरण समाधानकारक नाही, असे सांगून महापौर स्नेहल आंबेकर यांनी शिवसेनेचे नगरसेवक अवकाश जाधव यांनी 'एलईडी' दिव्याबद्दल मांडलेला हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.
| एलईडीवर चर्चा सुरू होण्याआधी दहिसरच्या एका मैदानाच्या विषयावर महापौरांनी बोलू न दिल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य व गटनेत्यांनी सभात्याग केला. त्यामुळे एलईडीवरील चर्चेवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सभात्याग केला. 'एलईडी' दिवे लावण्याचे कंत्राट ई टेंडरिंगच्या माध्यमातून न देता परस्पर एका कंपनीला देण्यास विरोध केला तसेच एलईडी दिवे लावल्यामुळे मरिन ड्राईव्ह येथील क्वीन्स नेकलेसची शान गेली आहे, अशी खंत शिवसेनेचे नगरसेवक अवकाश जाधव यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे व्यक्त केली. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी यावर बोलताना 'एलईडी'ला विरोध नाही; पण 'क्वीन्स नेकलेस'ची पूर्वीची शान पूर्वीसारखी टिकवण्यासाठी त्याच भागात सोडियम व्हेपर दिवेच लावण्याची आणि एलईडी दिवे लावण्याचे कंत्राट सरकारी कंपनीला परस्पर न देता 'ई टेंडरिंग'द्वारे देण्याची मागणी केली. या चर्चेत शिवसेनेचे राजू पेडणेकर, शीतल म्हात्रे, रमाकांत रहाटे, किशोरी पेडणेकर यांनी भाग घेतला आणि क्वीन्स नेकलेस पूर्ववत करावा आणि त्याचे कंत्राट ई टेंडर द्वारे द्यावे, अशी मागणी केली. मात्र भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी एलईडी दिव्यांमुळे वीज बचत होईल तसेच महापालिकेचीही ८0 कोटी रुपयांची बचत होईल, असे सांगून १९८0 पूर्वी 'क्वीन्स नेकलेस' कोणत्या दिव्यांचा होता, असा सवाल केला. 'क्वीन कोण आणि नेकलेस कोणता' असा सवाल भाजपाच्या ज्योती आळवणी यांनी केला असता विश्वासराव व शीतल म्हात्रे यांनी ज्यांना क्वीन्स नेकलेसची माहिती नाही, त्यांना मुंबई दर्शन घडवावे लागेल, असे प्रत्युत्तर दिले. यावरून शिवसेना आणि भाजपाच्या सदस्यांत काही वेळ वाद निर्माण झाला होता. 'क्वीन्स नेकलेस'ची शान गेल्यामुळे दोन हजार लोकांनी एका तासात सह्यांद्वारे विरोध केला, असे सांगून सभागृहात आयुक्तांसमोर सह्यांचे फलक झळकवले. समाजवादी काँग्रेसचे नगरसेवक आश्रफ आझमी यांनीही सरकारी कंपनीला परस्पर कंत्राट देण्यास विरोध केला. चर्चा सुरु असताना आयुक्तांनी सभागृहात येवून उत्तर देण्याची मागणी सदस्यांनी उचलून धरल्यामुळे आयुक्त सीताराम कुंटे सभागृहात आले. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मुंबईत एलईडी दिवे बसवण्यात येणार असून हे दिवे बसवण्याचे केंद्राचे राष्ट्रीय धोरण आहे, त्यानुसार हे दिवे बसवले जातील. एलईडीसंबंधी तांत्रिक माहिती दिली जाईल आणि एलईडीचे कंत्राट देण्याआधी महापालिका व स्थायी समितीची मान्यता घेण्यात येईल, हे कंत्राट ई टेंडरिंगने द्यावे की नाही यासंबंधी केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबाबत विचाराधीन आहोत व महापालिका अधिनियम ६९ अन्वये हा करार केला जाणार आहे, अशी माहिती आयुक्तांनी सभागृहाला दिली. या कामांसाठी नियम ७२-३ ची तरतूद आहे, त्याचाही वापर करावा का याचा विचार करण्यात येईल, असे आयुक्त म्हणाले. परंतू या उत्तराने सदस्यांचे समाधान न झाल्याने हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला. |
