जनतेचे लाडके आबा गेले - आज अंत्यसंस्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जनतेचे लाडके आबा गेले - आज अंत्यसंस्कार

Share This
मुंबई - विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण असलेले नेतृत्व आणि मोकळे-ढाकळे व्यक्तिमत्त्व, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. ऊर्फ आबा पाटील (वय 57) यांचे सोमवारी निधन झाले. आज दुपारी बारा वाजता अंजनी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आबांच्या निधनामुळे राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. 

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यातील अंजनी या छोट्या गावात एका सामान्य कुटुंबात आबांचा जन्म झाला. आर. आर. पाटील यांच्यातील नेतृत्व गुण हेरून माजी उपमुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांनी आबांना राजकारणाचे बाळकडू दिले. जिल्हा परिषद ते विधानसभा येथपर्यंतचा प्रवास आबांनी अल्पावधीतच पूर्ण केला. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी किंवा वारसा नसलेल्या आबांनी महाराष्ट्राची विधानसभा गेल्या 25 वर्षे गाजवली. सामाजिक जाण, उत्तम वक्‍तृत्वाची ओघवती नैसर्गिक शैली, शब्दांची चपखल लकब, विरोधकांना हळूवार काढलेले चिमटे अशा विविध कलागुणांमुळे आबांनी अल्पावधीतच उत्कृष्ट संसदपटू म्हणून नाव लौकिक मिळवला.
राज्याचे ग्रामविकासमंत्री ते उपमुख्यमंत्री म्हणून आबांनी गेल्या पंधरा वर्षांत यशस्वी धुरा सांभाळली. ग्रामविकास आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी विविध समाजपयोगी योजना राबवल्या. आबांच्या संकल्पनेतील "निर्मल ग्राम योजना‘ केद्र सरकारने स्वीकारली. 2004 मध्ये राज्यात डान्स बार बंदी कायदा आणून आबांनी तरुणाईत पसरलेली नशेची विषवल्ली रोखण्याचा प्रयत्न केला. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी तोंडात वेदना होत असल्याचे जाणवू लागल्यामुळे त्यांनी मुंबईच्या बीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय तपासण्या केल्या. त्या वेळी त्यांना मुखातील कर्करोगासारखी चिन्हे दिसत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र, निवडणुकीची धामधूम असल्याने त्यांनी निवडणुकीनंतर उपचार घेण्याचे निश्‍चित केले. निवडणूक निकालानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील विधिमंडळातील विशेष अधिवेशनाला ते उपस्थित राहिले. त्या वेळी त्यांनी आमदारकीची शपथ घेतानाच फडणवीस सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव असो किंवा विधानसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेता यांच्या निवडीच्या वेळी केलेली भाषणे ही अखेरची ठरली.
विशेष अधिवेशनानंतर उपचारासाठी आबा बीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले. बीच कॅंडीतील शस्त्रक्रिया झाल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी लीलावतीकडे दुपारी धाव घेतली. या वेळी आर. आर. यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सकाळी दहापासून त्यांची तब्येत अधिक ढासळू लागली आणि शरीरातील एकएक अवयव निकामी होऊ लागल्याने त्यांनी उपचाराला साथ देणे बंद केले. या कालावधीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेऊन घटनेची कल्पना दिली. मुख्यमंत्र्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत लीलावतीकडे धाव घेतली. 

 नाव - रावसाहेब रामराव पाटील 
 १६ ऑगस्ट १९५७ रोजी सांगलीमध्ये तासगाव तालुक्‍यातील अंजनी गावात जन्म
 प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत श्रमदान करून शिक्षण
 सांगलीतील शांतिनिकेतन महाविद्यालयात कला शाखेची पदवी आणि वकिलीचे शिक्षण पूर्ण
 उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता
 राजकीय प्रवास
 १९७९ ते १९९० पर्यंत जिल्हा परिषद सदस्य
 १९९० पासून सलग सहा वेळा आमदार
 ग्रामविकास मंत्रालयाची यशस्वी धुरा
 गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचं सर्वस्वी श्रेय आबांना
 उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून मोठी जबाबदारी

राजकारणातला "कॉमन मॅन‘  - शरद पवार 
विनम्रता, उत्तम वक्ता, सामाजिक जाण आणि पुरोगामी विचारांचा राजकारणातला "कॉमन मॅन‘ आज हरपला आहे. "आर.आर.‘ हे राष्ट्रवादीचा चेहरा होते. विचारांची मांडणी आणि स्पष्टता हे त्यांचे गुण सामाजिक राजकारणाचे पैलू होते. आबांचा स्वभाव आणि राजकीय जीवनात सतत सामान्य जनतेच्या हिताचा विचार होता. आर.आर. हे खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचे प्रतिनिधी होते. गोरगरीब जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आबांच्या राजकीय जीवनात होते. म्हणूनच ते महाराष्ट्राचे लाडके "आबा‘ होते. आबांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नुकसान झाले आहेच; पण महाराष्ट्र एका महान नेतृत्वाला मुकला आहे. माझ्या राजकीय जीवनातला सच्चा सैनिक आज हरवला. पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आज आपल्यातून गेला. त्यांचे योगदान महाराष्ट्राच्या विकासाची दिशा ठरवणारे आहे, ते निरंतन राज्यातील जनतेच्या लक्षात राहील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages