शवागार हटवण्यावरून सेना-भाजपामध्ये जुंपली ! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शवागार हटवण्यावरून सेना-भाजपामध्ये जुंपली !

Share This
पालिकेच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये गेली दोन वर्षांपासून बांधून तयार असलेले नियोजित शवागार हटवण्यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. राज्याच्या महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री आ. विद्या ठाकूर यांनी नुकतीच सिद्धार्थ हॉस्पिटलच्या पाहणी दौर्‍यादरम्यान स्थानिकांना शवागाराचा त्रास होणार असेल तर पर्यायी जागेचा विचार करावा लागेल, असे सूतोवाच केले होते. या वक्तव्यामुळे शिवसैनिकांचे पित्त खवळले. कोणत्याही परिस्थितीत शवागार हटवू दिले जाणार नाही, असा निर्धार शिवसैनिक व्यक्त करत आहे.

पश्‍चिम उपनगरातील जोगेश्‍वरी ते मालाड येथील नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेने सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये सर्व यंत्रणेसह गेल्या दोन वर्षांपूर्वी शवागार बांधले. मात्र मागील आघाडी सरकारच्या कारकीर्दीत गृहखाते आणि आरोग्य खात्याच्या सावळ्यागोंधळात हे शवागार लालफितीत अडकले होते. आता आरोग्य खात्याने या शवागारासाठी लागणारे ४ डॉक्टर्स आणि २५ कर्मचारी असा एकूण २९ जणांचा स्टाफ उपलब्ध करून दिला नसल्यामुळे शवागार अजून सुरू झाले नाही, अशी माहिती प्रमिला शिंदे यांनी दिली. येथे शवागार उभारण्यासाठी आपण पालिकेची सर्व यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. येथील परिसरातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून शवागाराच्या बाहेरून संरक्षक भिंत बांधून दिली. कूपर हॉस्पिटल आणि भगवती हॉस्पिटलवर अतिरिक्त ताण पडत असून मृतांवरील शवविच्छेदनासाठी नागरिकांना खूप वेळ वाट पाहावी लागते. या नियोजित शवागारामुळे पडणारा ताण कमी होणार आहे. जर येथील शवागार अन्यत्र हटवले तर शवविच्छेदनासाठी विरोध करणार्‍यांकडे मृतदेह पाठवावे लागतील, असा टोला माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी दिला.

मूठभर ३२ रहिवाशांच्या विरोधासाठी जोगेश्‍वरी ते मालाड परिसरातील लाखो नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे असून उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि नगरसेविका प्रमिला शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून बांधून तयार असलेले शवागार कोणत्याही परिस्थितीत शिवसेना अन्यत्र हटवू देणार नाही, असा ठोस इशारा दिलीप शिंदे यांनी दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages