लाचखोर कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी मोबाईल ऍप्स - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाचखोर कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी मोबाईल ऍप्स

Share This
मुंबई - भ्रष्टाचाराचा नायनाट करायचा असेल, तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पारदर्शी कामकाज करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सामान्य जनतेसाठी मोबाईल ऍप्स विकसित केले असून, जनतेने याचा फायदा करून घ्यावा, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. 

भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी व लाचखोरीशी संबंधित तक्रारी प्राप्त करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टच्या साहाय्याने मोबाईल ऍप्स तयार केले असून, त्याचे अनावरण करताना मुख्यमंत्री बोलत होते. http://acbmaharashtra.gov.in या वेबसाइटवरील होमपेजवरून हे ऍप्स डाऊनलोड करून घेता येईल. तसेच इंटरनेटची सुविधा असलेल्या मोबाईल, टॅब्लेट, डेस्कटॉप, लॅपटॉप यंमध्ये त्याचा सहज वापर करता येईल. या ऍप्समार्फत आलेल्या तक्रारी एसीबी मुख्यालय, संबंधित पोलिस अधीक्षक आणि संबंधित विभागप्रमुखांना ईमेलद्वारे पाठविल्या जातील. 

मुख्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला ऍन्टी करप्शन ब्युरोचे महासंचालक प्रवीण दीक्षित, पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टचे अधिकारी व बॉम्बे कोडिंग कंपनीच्या निमिषा गौरीशंकर आदी अधिकारी उपस्थित होते. लोकशाही समृद्ध करण्यासाठी पारदर्शी सत्ता प्रस्थापित करणे गरजेचे आहे. शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा असून, या मोबाईल ऍप्सच्या साहाय्याने अपारदर्शी कारभार कमी करण्यास सहकार्य मिळेल, असेही ते पुढे म्हणाले. या वेळी प्रवीण दीक्षित म्हणाले की, या ऍप्सद्वारे मोबाईलमार्फत सिंगल क्‍लिकद्वारे तक्रार नोंदविणे शक्‍य होणार आहे. हे ऍप्स मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध असून, खोट्या तक्रारी टाळण्यासाठी फक्त मोबाईल क्रमांक आवश्‍यक ठेवण्यात आला आहे. नमूद ऍप्समध्ये तक्रारदाराकडे पुरावा म्हणून जर कागदपत्रे, फोटो, ऑडिओ, व्हिडीओ फाइल्स उपलब्ध असल्यास ती जोडून पाठविण्याची तसेच नि:शुल्क क्रमांक 1064 डायल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही दीक्षित यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages