मालमत्ता कराचा प्रस्ताव २0 मार्चपर्यंत संमत न केल्यास मुंबईकरांवर बोजा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 March 2015

मालमत्ता कराचा प्रस्ताव २0 मार्चपर्यंत संमत न केल्यास मुंबईकरांवर बोजा

मुंबई : मुंबई महापालिकेने कार्पेट एरियावर आधारित मालमत्ता करप्रणाली तयार केली असून या सुधारित कराच्या प्रस्तावास येत्या २0 मार्चपूर्वी स्थायी समिती व सभागृहाने मंजुरी न दिल्यास मुंबईकरांवर मालमत्ता करापोटी २७.४३ टक्के म्हणजेच एक हजार ९२ कोटींचा बोजा पडणार आहे. जर हा प्रस्ताव २0 मार्चपूर्वी संमत केल्यास ५७८ कोटी म्हणजेच १४.५२ टक्के बोजा पडेल. बुधवारी याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत संमतीसाठी आला असताना, काँग्रेसच्या सदस्यांनी त्याला विरोध केला. या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी नियमानुसार ७२ तास दिलेले नाहीत, असे कारण नगरसेवकांनी दिले. हा प्रस्ताव मंगळवारीच वितरित झाल्याने आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, प्रस्ताव बुधवारी संमत न करण्यासाठी काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले होते.त्यामुळे अध्यक्षांनी प्रस्तावावर गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष बैठक घेण्याचे मान्य केले आहे. 


हा प्रस्ताव समितीमध्ये संमतीसाठी आणला असता, केवळ सर्वपक्षीय गटनेत्यांनाच हा विषय माहिती असल्यामुळे व काँग्रेसच्या सदस्यांना याबद्दल काहीच माहिती नाही आणि नियमाने ७२ तास अगोदर हा प्रस्ताव दिलेला नाही, असा जोरदार आक्षेप काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला. त्यावरून सत्तारुढ शिवसेना-भाजपा विरुद्ध काँग्रेस असा वाद, शाब्दिक खडाजंगी बराच वेळ रंगली होता. हा प्रस्ताव आजच संमत करा, असा आग्रह सत्तारुढ पक्षाचे सदस्य करत होते. हा प्रस्ताव २0 मार्चनंतर संमत केला तर, मुंबईकरांवर १0९२ कोटींचा बोजा पडणार असून २0 मार्चआधी संमत केल्यास मुंबईकरांवर केवळ ५७८ कोटींचा बोजा पडणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख व पालिकेचे मुख्य कर निर्धारक आणि संकलक रमेश आरोटे यांनी स्थायी समितीला दिली. 

Post Bottom Ad