केईएम डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जन्माआधीच बालक दगावले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 March 2015

केईएम डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जन्माआधीच बालक दगावले

मुंबई : पालिकेच्या प्रभादेवी येथील प्रसूतीगृहातील आणि केईएममधील डॉक्टरांच्याही हलगर्जीपणामुळे बालकाचा जन्माआधीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बाळाच्या आईला प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर ती प्रभादेवीच्या प्रसूतीगृहात गेली असता, तिचे 'सिझेरियन' करण्याची गरज असूनही रविवारी शस्त्रक्रिया करत नसल्याचे सांगून तिची केईएम रुग्णालयात बोळवण केली. मुंबई महापालिकेतील सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत या घटनेबाबत हरकतीचा मुद्दा मांडला असता प्रभादेवीच्या प्रसूतीगृहातील व केईएममधील डॉक्टरांचीही उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी या वेळी सांगितले. 


'कांचन निखिल चव्हाण यांना रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रसूतीवेदना होऊ लागल्याने त्यांना तत्काळ प्रभादेवी येथील महापालिका प्रसूतीगृहात दाखल करण्यात आले होते. पण कांचन यांच्या उदरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बाळाच्या जन्मासाठी 'सिझेरियन' करावे लागेल असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र रविवारी 'सिझेरियन' करत नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगून केईएमला नेण्याचा सल्ला दिला. प्रभादेवी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना दुपारी ३ वाजता केईएम रुग्णालयात नेले व सायंकाळी ६ वाजेपर्यंत 'सिझर' करून प्रसूती करण्याचा सल्ला दिला होता. पण केईएममधील संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना 'सिझर' करण्याची आवश्यकता नाही, तुमची 'डिलिव्हरी नॉर्मल' होईल, असेही तेथील डॉक्टरांनी चव्हाण यांना सांगितले. चव्हाण यांना प्रसूतीवेदना होण्यासाठी ३0 इंजेक्शन्स देऊन रात्री १ वाजता त्यांची नॉर्मल प्रसूती केली, पण त्यांचे बाळ दगावले होते. 'सिझर' करून प्रसूती करण्याचा सल्ला दिलेला असतानाही केईएममधील संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच कांचन चव्हाण यांचे बाळ दगावले, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून याबाबत सखोल चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. 

कांचन प्रभादेवीच्या प्रसूतीगृहात गेल्यानंतर तिला येथे रविवारी सिझेरियन होत नाही, असे उत्तर वैद्यकीय अधिकारी कसे देऊ शकतात, केईएममध्ये पाठवण्याआधी तिची केस हिस्ट्री प्रभादेवी प्रसूतीगृहातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तयार केली होती का, केईएमला पाठवण्याआधी कांचनची सोनोग्राफी केली होती का, तिचे सिझर करण्याचा सल्ला प्रभादेवी प्रसूतीगृहाच्या डॉक्टरांनी दिला असताना, केईएममधील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कांचनला 'सिझर' करण्याची गरज नाही, असे कशाच्या आधारे सांगितले, कांचनच्या बाबत प्रभादेवी व केईएममधील वैद्यकीय अधिकार्‍यांनी योग्य वेळी योग्य निर्णय का घेतले नाहीत, असा कडक प्रश्नांचा 'डोस' विश्‍वासराव यांनी स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेच्या आरोग्य विभागाला केला. या विभागाचे प्रमुख असलेले अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या संचालिका डॉ. सुहास नागदा समितीच्या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Post Bottom Ad